बदनापूर (जालना ) : तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प व त्या शेजारी असलेला वाल्हा येथील सिंचन प्रकल्प एकमेकांना जोडण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. परिणामी तालुक्यातील सिंचनावर परिणाम झाला आहे.
तालुक्यातील सोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्पाच्या शेजारी हाकेच्या अंतरावर वाल्हा सिंचन प्रकल्प आहे. अनेक वर्षांपासून हे प्रल्पक एकमेकांना जोडण्याची मागणी होत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे अनेकदा एका सिंचन प्रकल्पात जास्त पाणी येते. परिणामी सोमठाणा धरण ओव्हरफ्लो होवून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. वाहून जाणारे पाणी शेजारील धरणात सोडल्यास परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. वाल्हा धरणापासून काही अंतरावर राजेवाडी साठवण तलाव हा सिंचन प्रकल्प आहे. शासन ज्याप्रमाणे नदीजोड प्रकल्प राबवित आहे. त्याच धर्तीवर शासनाने हर धरणजोड प्रकल्प राबविण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
या तिन्ही प्रकल्पाखाली या तालुक्यातील सुमारे २० ते २५ गावांमधील हजारो हेक्टर जमीन बारा महिने सिंचनाखाली येवू शकते. तसेच तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठीही हे पाणी उपयोगात येवू शकते. तालुक्यातील सिंचन क्षेत्र घटल्यामुळे मोसंबीचे आगार असलेल्या जिल्ह्यात आता नावालाच मोसंबी बागा आहेत. हजारो हेक्टर बागायती क्षेत्र कोरडवाहू झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पान्नावरही परिणाम झाला आहे. यावर्षी सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पात कमी पाणी असल्यामुळे या प्रकल्पाच्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक गावातील शेतीला या धरणाचे पाणी सोडता आले नाही. मात्र हेच धरण मागील वर्षी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सुमारे महिनाभर या धरणातील पाणी वाहत होते. काही वर्षांपूर्वी प्रशासनाकडून दुधना प्रकल्प व वाल्हा तलाव जोडण्याबाबत प्रस्तावही शासनाकडे गेलेला आहे. परंतु शासनाच्या लालफितीत हा प्रस्ताव अडकला आहे. तालुक्याती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हा जोडप्रकल्प पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
परिसर सुजलाम् सुफलाम् होईल तालुक्यातील दुधना, वाल्हा व राजेवाडी हे तिन प्रकल्प एकमेकांना जोडल्या गेले तर हा परीसर सुजलाम सुफलाम होईल. शेतीसाठी याचा मोठा फायदा होईल. याबाबत पाठपुरावा सुरू असून काही दिवसापूर्वीच पालकमंत्र्यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली आहे. या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. हा प्रकल्प झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होईल.- भानुदास घुगे
जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता प्रस्तावजिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोमठाणा येथील अप्पर दुधना धरणाचे ओव्हरफलोचे पाणी वाहून जात असल्यामुळे हे पाणी वाल्हा धरणात सोडण्यासाठी सोमठाणा व वाल्हा धरण एकमेकांना जोडण्याबाबत एक प्रस्ताव पाठविलेला आहे. त्यामधे जमीन संपादीत करावी लागत नाही. भूमिगत रितीने ही दोन धरणे एकमेकांना जोडली जावू शकतात. हे पाणी पुढे वळवायचेच असेल तर घाणेवाडीलाही वळविता येवू शकते. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकड प्रस्ताव पाठवलेला आहे.- बालाजी क्षीरसागर, तत्कालीन तहसीलदार.