बदनापूर ( जालना ) : तालुक्यात शुक्रवारी रात्री पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील वाकुळणी येथे ओढ्याचे व शेतामधील पाणी गावात आल्याने ग्रामस्थांचे हाल झाले. सततच्या मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तालुक्यात शुक्रवारी पुन्हा मुसळधार पाऊस झाला. यामुळे खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच तालुक्यातील वाकुळणी येथे गावाजवळून वाहणाऱ्या ओढयाचे व शेतीचे पाणी गावात साचले होते. या गावात आलेल्या पाण्यामुळे हनुमान मंदिरासमोर असलेली जुनी बारव पाण्याने भरली होती. तसेच गावातील बस स्थानक परिसरात पाणीच पाणी झाले होते. सुकना नदीला मोठा पूर आला असून या नदीवर बांधण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा दुथडी भरुन वाहु लागला आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक गावांमधील खरीप पिकांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. कापूस, सोयाबीन, मका, तूर, बाजरी अशा अनेक पिकांचे नुकसान होत आहे. तालुक्यातील अनेक नदीनाल्यांना पुराचे पाणी आले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शनिवारी सुद्धा सकाळपासून पाऊस सुरू झाला होता. शुक्रवारी बदनापूर मंडळात 62 मिलिमीटर रोशनगाव मंडळात 45 मिलिमीटर शेलगाव मंडळात 35 मिलिमीटर दाभाडी मंडळात साठ मिलीमीटर व बावणे पांगरी मंडळात चार मिलिमीटर असा एकूण 206 मिलिमीटर पाऊस झाला असून त्याची सरासरी 41.2 मिलिमीटर एवढी आहे.