लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आजवर बागेश्वरी साखर कारखान्यातून २ लाख ५१ हजार मे. टन उसाचे सरासरी गाळप झाले आहे. यातून २ लाख ८२ हजार २२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, ९ मार्च रोजी कारखाना बंद होणार आहे.परतूर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा बागेश्वरी साखर कारखाना सुरू झाला तेव्हापासून आजवर सुरळीत व शिस्तीत सुरू आहे. त्यामुळे या भागात नामशेष होणारे उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले. कारखाना प्रशासनाने उसाचे क्षेत्र वाढीसाठी शेतकऱ्यांना अनेक सुविधा व योजना राबवून ऊस लागवडीस चालना दिली. यामुळे या भागात उसाचे क्षेत्र वाढले. शेतक-यांनाही आपला ऊस जाण्याची हमी मिळाल्याने अल्प पाण्यावर नियोजन करून शेतकरी उसाकडे वळला. निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटरवर मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली. शेतक-यांनी या पाण्यावर पाईपलाईन करून उसाची लागवड केली. दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे उसाचे पीक धोक्यात आले आहे.मध्यंतरी निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणी शहराची तहान भागविण्यासाठी सोडण्यात आले होते. यावेळी निम्न दुधना प्रकल्प पूर्ण रिकामा झाला होता. यंदा मात्र, परतीच्या पावसाने या धरणात थोडे फार पाणी येण्याबरोबरच उसाच्या पिकाला जिवदान मिळाले.यावर्षी कारखाना परिसरात ७ हजार हेक्टर वर ऊस होता. तर मागील वर्षी १० हजार हेक्टरवर ऊस होता. मागील वर्षी एक महिना लवकर कारखाना सुरू होऊन १२ एप्रील २०१९ रोजी परिसरातील उसाचे पूर्ण गाळप करून बंद झाला होता. यावर्षी मात्र एक महिना उशीरा सुरू होऊनही महिना अगोदरच बंद करण्याची वेळ येत आहे.परिसरात केवळ २५ हजार टन ऊस गाळप राहिला आहे. हा कारखाना जास्तीत जास्त ९ मार्च पर्यंत चालण्याची शक्यता कारखाना प्रशासनाने व्यक्त केली आहे. याचे कारण ब-याच शेतक-यांनी बाहेरच्या कारखान्यास ऊस दिला आहे. मागील वर्षीही काही शेतक-यांनी बाहेर ऊस दिला होता. मात्र, कारखान्याने त्या शेत-यांचा ऊस सहानभुती दाखवून आणला होता. पुढील वर्षी हे चित्र बदलणार आहे. ज्या शेतक-यांनी बाहेर ऊस दिला. त्यांचा ऊस आणण्याची जबाबदारी कारखाना घेण्याची शक्यता कमी आहे. कारण, यावर्षी परतूर तालुक्यात व कारखाना परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
नऊ मार्चला होणार बागेश्वरी साखर कारखाना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 12:29 AM