कोरोनाच्या प्रादुर्भावात गत वर्षभर शाळा बंद होत्या. चालू वर्षात रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. या धर्तीवर शासनाने आता पाचवी ते सातवीचे वर्गही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या गावात महिनाभरापासून कोरोनाचा रुग्ण नाही, अशा गावातील शाळा सुरू होणार आहेत. परंतु, कोरोनाबाबत येणारे अहवाल पाहता जिल्हा प्रशासनाने पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे.
जिल्ह्यात सध्या माध्यमिकच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
माध्यमिकचे वर्ग सुरू असले तरी अनेक मुलांना पालक शाळेत पाठविण्यास नकार देत आहेत.
जी मुले शाळेमध्ये येत आहेत. त्यांचीही वेळोवेळी तपासणी केली जात आहे.
सॅनिटायझेशनसाठी शाळा अनुदानावर भर
शाळा सुरू करताना सॅनिटायझरसह इतर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. परंतु, शासकीय निधी उपलब्ध नाही. त्यामुळे शाळा अनुदानातून ही रक्कम खर्च होणार आहे.
मुख्याध्यापकांना लेखी आदेशांची प्रतीक्षा
ज्या गावात कोरोना रूग्ण नाहीत तेथील शाळा सुरू करण्याबाबत आदेश आहेत. परंतु, जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापक लेखी आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
अधिकाऱ्यांची बैठक
जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमवेत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शासकीय मार्गदर्शनानुसार प्राथमिक वर्गाचा निर्णय होणार आहे.
शिक्षणाधिकारी म्हणतात
जिल्ह्यात सध्या माध्यमिकचे वर्ग सुरू आहेत. शासन निर्देशानुसार शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी केली जात आहे. तसेच शासनाकडेही मार्गदर्शन मागविले असून, त्यानुसार निर्णय होणार आहे.
- कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी
कोणत्या वर्गात
किती विद्यार्थी ?
पहिली ३८२७७
दुसरी ४२५०७
तिसरी ४०२६३
चौथी ३९३०६
पाचवी ३९८३०
सहावी ३७७७५
सातवी ३८३२०
आठवी ३६४८३
नववी ३५२६७
दहावी ३५२९८