लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महत्त्वाच्या विभागांच्या बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवरून अधिकाऱ्यांची चांगलीच फिरकी घेतल्याने अधिका-यांची भंबेरी उडाल्याचे दिसून आले. अनेक प्रकरणांमध्ये समाधानकारक उत्तरे न देता आल्याने दानवे जाम चिडल्याचे दिसून आले. कामांमध्ये सुधारणा करून त्यांची गती वाढविण्याचे निर्देश दानवे यांनी उपस्थित यंत्रणेतील अधिका-यांना दिले.ब-याच महिन्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. दुपारी एक ते चार यावेळेत जिल्हा ग्रामीण यंत्रणेसह वीज वितरण कंपनीच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह विविध विभागांच्या खाते प्रमुखांची उपस्थिती होती. प्रारंभी पंडित दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास अभियानाचा आढावा घेताना संबंधित विभागाने सांगितले की, जिल्ह्यातील जवळपास १३९९ सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण दिले आहे, त्या पैकी १२३९ जणांना नोकरी लागल्याचे सांगितले. यापैकी एका तरी व्यक्तीचा आणि तुमचा संपर्क झाला का असा सवाल करून किमान तुम्ही म्हणजेच जिल्हाधिकारी आणि सीईओंनी आढावा घेतला काय, असे विचारल्यावर अधिकारी निरुत्तर झाले.वीज वितरण कंपनीच्या एकूणच कामकाजाबद्दल दानवेंनी नाराजी व्यक्त केली. डीपी दुरूस्तीच्या नावाखाली जो गोंधळ सुरू आहे, त्यात सूत्रता आणण्यासाठी ही सर्व कामे आॅनलाईन कसे करता येतील यावर विचार करण्याचे त्यांनी सांगितले. डीपी दुरूस्तीसाठी शेतक-यांची होणारी ससेहोलपट त्यांनी बैठकीत त्यांच्या खास शैलीत सांगितली. विद्युत केंद्र उभारणीची मुदत संपूनही अनेक ठिकाणी या कामांना प्रारंभ न झाल्याबद्दल संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. एकूणच संबंधित कंत्राटदारांना अधिकारी पाठीशी घालत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंत्यांसह अनेक अधिकारी हे त्यांचे मोबाईल घेत नसल्याच्या नागरिकांच्या तक्ररी असल्याचे त्यांनी नमूद केले. यासह पंतप्रधान सडक योजनेच्या कामांचा उडालेला बोजवारा, पाणंद रस्ते आणि त्यांची रखडलेली कामांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तसेच सीईओंना बैठकीत दिले. कृषी विभागावरही त्यांनी रोष व्यक्त केला. बजाज अॅलायंज कंपनीने कृषी विमा भरण्यासाठी करार न केल्या प्रकरणी अधिका-यांनी आम्हांला अंधारात ठेवल्याचे सांगून याबद्दल आता पुढील महिन्यातील ८ तारखेला दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा मुद्दा निकाली काढण्याचे ते म्हणाले.उडवाउडवीच्या उत्तरांनी अचंबितजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेत घनसावंगीत १९८ जणांना प्रश्क्षिण दिले. अन् नोकरी १९९ जणांना लागल्याचे दानवेंना दिलेल्या माहिती पुस्तिकेत नमूद केल्याच्या मुद्यावरून मोठा गोंधळ उडाला. दानवेंनी या मुद्यावरून अधिका-यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली.सिंचन क्षमता वाढविण्यासाठी मनरेगातून सिंचन विहिरींची अपूर्ण कामांवरूनही दानवेंनी अधिका-यांना जाब विचारला. यात पूर्वीच्या ९९९ विहिरी अपूर्ण असून, नवीन एक हजार ५०० विहिरींना मंजुरी मिळूनही त्यांची कामे सुरू न झाल्याबद्दल खंत व्यक्त करून ते तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच अधिका-यांच्या उत्तरांनी अनेकांना अचंबित केले.
दानवेंच्या फिरकीसमोर अधिकाऱ्यांची भंबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 1:04 AM