आष्टी : पडणारी रोगराई, बाजारपेठेतील अल्प दर आणि हाती न पडणारा उत्पादन खर्च यामुळे सोपारा (ता.परतूर) येथील शेतकऱ्याने जेसीबीद्वारे केळीची बाग मोडून टाकली. या बागेतील केळीची दोन हजार झाडे काढण्यात आली आहेत.
परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील लोणी, भगवाननगर, आनंदगाव, पळशी, बाणाची वाडी, वडरवाडी, ढोकमाळ तांडा, सोपारा, कोकाटे हादगाव, ढोणवाडी येथे केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते; परंतु मागील वर्षापासून करप्या रोग आणि कमी भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकरी ऊस लागवडीला प्राधान्य देत आहेत. सोपारा येथील शेतकरी अशोक मिठे यांनी त्यांच्या एक एकर शेतात मागील वर्षी जून महिन्यात दोन हजार केळीच्या झाडांची लागवड केली होती. वर्षभर पाणी आणि खत व्यवस्थापन यासाठी जवळपास ६० हजार रुपये खर्च केला; परंतु सध्या केळीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. दुसरीकडे तीनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल भाव असून, उत्पादन खर्चही हाती पडत नसल्याने मिठे यांनी जेसीबीच्या साहाय्याने दोन हजार केळीची झाडे उद्ध्वस्त केली.
दोन लाखांचे नुकसान
शेतकरी अशोक मिठे यांच्या केळीच्या बागेवर करपा रोग पडला असून, बाजारात दरही कमी आहेत. त्यामुळे त्यांनी ही बाग उद्ध्वस्त केली आहे. यात त्यांना जवळपास दोन लाख रुपयांचा फटका बसला आहे. रोगराईमुळे ही बाग उद्ध्वस्त करण्यात आल्याने शासनाने केळी बागांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
फोटो