लोकमत न्यूज नेटवर्कआंबा : परतूर येथील महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बुधवारी ग्राहकांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी संबंधित कार्यालयासमोर जाऊन बँड वाजविण्यात आला. महावितरणच्या या गांधीगिरीतून जवळपास पावणेचार लाख रूपये वसूल झाले. जिल्हाभरात अशी मोहीम महावितरणने हाती घेतली आहे.महावितरणची जिल्ह्यातील अनेक ग्राहकांकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी आहे. एक लाखावर थकबाकी असलेल्या ग्राहकांची वीज खंडित करण्याच्या व थकबाकी वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने आता थकबाकीदारांच्या दारात, कार्यालयासमोर बँड वाजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. परतूर येथील कार्यालयांतर्गत एक लाख रूपयावर थकबाकी असलेले पाच ग्राहक असून, त्यांच्याकडे १५ लाख ७० हजार ५४६ रूपयांची थकबाकी आहे. महावितरणच्या पथकाने बुधवारी सकाळीच बँड वाजवून थकबाकी वसूल करण्यास सुरूवात केली. प्रारंभी बीएसएनएल कार्यालयाकडे असलेल्या ३ लाख ६९ हजार १४३ रूपये थकीत वसुलीसाठी बँड वाजविण्यात आला. तेथून पुढे विविध थकबाकीदारांच्या कार्यालयासमोर, कंपनीसमोर जाऊन बँड वाजविण्यात आला. परतावाडी येथील सय्यद स्टोन क्रशरकडील ३ लाख ७३ हजार ४३८ रूपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. यावेळी सहायक अभियंता पी. एस. गणोर, एम. ए. रामटेके, एम. बी. सानप यांच्यासह बी. एस. होंडे , आर. आर. जाधव, एस. पी. शिंदे, पी. जी. नवटक्के, आर. एस. वणवे, एच. डी. काळे, आर. बी. आढाव, आर. पी. भामट, आर. एस. भुबर, ए. व्ही. आघाव आदी कर्मचारी उपस्थित होते.
वसुलीसाठी वाजविला जातोय बँड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:58 AM