जालना : शालेय स्तरावरील मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसह इतर शासकीय योजनांचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जाणार आहे. परंतु, जिल्ह्यातील दीड लाखावरील मुलांचे बँक खाते अद्याप डीबीटी अंतर्गत अद्ययावत करण्यात आलेले नाही.
पहिली ते आठवीच्या मुलांचे बँक खाते डीबीटी अंतर्गत अद्ययावत करण्याच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिक्षण विभागाने तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. परंतु, गावपातळीवरील पालकांसमोर असलेल्या एक ना अनेक अडचणींमुळे शालेय मुलांचे खाते डीबीटी अंतर्गत अद्ययावत करण्यात अडथळे येत आहेत. हे अडथळे दूर व्हावेत, यासाठी शिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
या योजनांच्या लाभासाठी बँक खाते आवश्यक
अल्पसंख्याक स्कॉलरशिप, सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ दिला जातो.
अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या मुलांची शिष्यवृत्ती.
कोरोनातील पोषण आहाराचा निधी व इतर शासकीय योजनांचा निधी हा मुलांच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे.
पालकांना येणाऱ्या अडचणी काय?
अनेक शालेय मुलांचे आधार कार्ड अपडेट नाही. त्यामुळे खाते उघडताना अडचणी येतात. अनेक पालकांच्या खात्यावर व्यवहार नसल्याने खाते बंद आहे. निधी आल्यानंतर बँक कपात करून घेते.
मुलांना खाते उघडण्यासाठी पॅन कार्डची मागणी बँकेकडून केली जात आहे. यासह इतर विविध अडचणी मुलांचे खाते उघडताना पालकांना येत असल्याचे अनेक पालकांनी सांगितले.