लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीनंतर सोमवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी केशव नटके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार ओह. सभापतीपदी आपलीच वर्णी लागेल, अशी आशा असलेले सदस्य गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.जालना जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने पुन्हा आपले वर्चस्व कायम राखले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपने पाच सदस्य फोडल्याने निवडणुकीत रंगत आली होती. परंतु, ऐनवेळी भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याने महाविकास आघाडीने झेडपीवर आपले वर्चस्व कायम राखले. अत्यंत अटीतटीची होणारी ही निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी महाविकासआघाडीचे उत्तम वानखेडे तर उपाध्यक्षपदी महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली. असे असले तरी भाजपने दोन सभापती देण्याच्या अटीवरच अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीतून माघार घेतली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जे सदस्य सभापतीपदासाठी गुडघ्याला बाशींग बांधून आहे. त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरणार असल्याचे चित्र आहे.जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेल्या विशेष सभेच्या तारखेनंतर १५ दिवसाच्या आत विषय समित्यांचे सभापती निवडण्यासाठी सभा आयोजित करणे आवश्यक आहे. त्यानुसार सोमवारी पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.११ ते १ वाजेपर्यंत अर्ज स्विकारल्या जाणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता सभेला सुरूवात होणार आहे.इच्छुकांच्या आशा उंचावल्याजिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण सभापती म्हणून सुमनबाई घुगे, शिक्षण व आरोग्य रघुनाथ तौर, समाजकल्याण दत्ता बनसोडे तर कृषी सभापती म्हणून जिजाबाई कळंबे आहेत. महाविकास आघाडीकडून सभापतीपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत.यात काँग्रेसचे राम सावंत यांच्या पत्नी, काँग्रेसचे सईदाबी अब्दुल परसुवाले, शिवसेनेच्या अयोध्या जयप्रकाश चव्हाण, यादव राऊत, बाबासाहेब गोल्डे भाजपचे राहुल लोणीकर यांची नावे चर्चेत आहेत.
सभापतीपदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 01:15 IST