जालना : भारतीय जनता युवा मोर्चाचे जालना येथील पदाधिकारी शिवराज नारीयणवाले यांना अमानूषपणे मारहाण करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही; तर त्यांची सखोल चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
मातोश्री लाॅन्सवर आयोजित या पत्रकार परिषदेत बोलताना विक्रांत पाटील म्हणाले की, जालना शहरातील भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवराज नारीयणवाले यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या वतीने गवळी समाजाला दीपक हाॅस्पिटलमध्ये होत असलेल्या शिवीगाळ व दमदाटीचे मोबाईल फोनमधून चित्रीकरण केले. या अपराधाची शिक्षा म्हणून नारीयणवाले या तरुणास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली. वास्तविक पाहता पोलिसांनी नारीयणवाले या तरुणास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अमानूषपणे मारहाण केली. या मारहाणप्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले आहेत. शिवराज नारीयणवाले या तरुणास अमानूषपणे झालेल्या मारहाण प्रकरणाचा विषय हा अत्यंत गंभीर असा आहे. या मारहाणप्रकरणी खिरडकर आणि प्रशांत महाजन यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत. खिरडकर आणि महाजन यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही; तर त्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे, अशी भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी आहे. या मारहाणप्रकरणी दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आपण शनिवारी जालना येथील पोलीस अधीक्षक विनायक देशमुख व जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, महामंत्री सुशील मेंगडे, प्रदेश सचिव प्रेरणा होनराव, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस, भारतीय जनता महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव, सुनील आर्दड, गोविंद डेंबरे, सचिन गाडे आदींची उपस्थिती होती.
विधान परिषदेत प्रकरण लावून धरणार
नारीयणवाले या तरुणास झालेले मारहाणप्रकरण भारतीय जनता पार्टीचे विधानसभा व विधान परिषदेत विरोधी पक्षनेते विधिमंडळात लावून धरणार असून, लोकसभेतही हे प्रकरण उपस्थित केले जाणार आहे. दीपक हाॅस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोड प्रकरणात आरोपी निष्पन्न झालेले नाहीत. पोलिसांकडून अमानूषपणे मारहाण झालेल्या शिवराज नारीयणवाले या तरुणास या तोडफोड प्रकरणात जाणीवपूर्वक अडकविण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून होईल. असे झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा त्याला विरोध करून कोरोना, संचारबंदी झुगारून रस्त्यावर आंदोलन करील, असा इशाराही विक्रांत पाटील यांनी यावेळी दिला.