जालना : प्रेयसीसोबत लग्न केले. नंतर घर चालविण्यासाठी पैसे नसल्याने तो चक्क एटीएमसमोर दोन-दोन तास उभा राहायचा. एखादा भोळा भाबडा व्यक्ती पैसे काढण्यासाठी आला की, त्याला पैसे काढून देतो असे म्हणायचा. नंतर पिन विचारून घ्यायचा अन् एटीएम बदली करून हजारो रुपये लंपास करायचा. या आरोपीला सदर बाजार पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. शैलेश प्रदीप शिंदे (२२, रा. निलंगा, लातूर) असे संशयिताचे नाव आहे.
शैलेश शिंदे हा मूळ लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील आहे. आई-वडील मंजुरी करून घर चालवितात. तो एकुलता एकच आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे आई-वडील नाशिक येथे कामासाठी गेलेे. त्यांच्यासोबत शैलेशही आला. तेथील काही मित्रांबरोबर त्याची मैत्री झाली. त्याचे मित्र गुन्हेगार असल्याने हळूहळू त्याचे पाऊल गुन्हेगारीत पडत गेले. तो आधी जुगार खेळायचा. जुगारात जास्तीचे पैसे गेल्याने त्याच्याकडे पैसे नसायचे. त्याने एका मुलीशी प्रेम केले. घरच्यांना हे मान्य नसल्याने ते लातूर येथे राहण्यासाठी गेले. प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी व घर चालविण्यासाठी त्याने एटीएममध्ये अफरातफर करण्याचा विचार केला. तो थेट जालन्यासह इतर वेगवेगळ्या शहरांत जाऊन एटीएमसमोर दोन -दोन तास थांबायचा. एखादा भोळाभाबडा माणूस किंवा महिलांना एटीएममधून पैसे काढून देतो असे सांगून पैसे काढण्याचा बहाणा करायचा. नंतर एटीएम बदलून त्या एटीएममधून लाखो रुपये काढायचा. त्याने महिनाभरापूर्वीच जालन्यातील एका महिलेला २० हजार रुपयांना गंडा घातला होता.
याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. दोन दिवसांपूर्वीच तो नाशिक येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून त्याला सदर बाजार पोलिसांनी अटक केली, अशी मागणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी दिली.
फसवणुकीचे ६ गुन्हेशैलेंद्र शिंदे हा प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी व घर चालविण्यासाठी एटीएम बदलून लाखो रुपये काढायचा. त्याने जालन्यातील सहा ते सात लोकांना गंडा घातला आहे. त्याच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध घेऊन आम्ही त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.-राजेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक