जालना : अंगणात खेळणाऱ्या १२ वर्षाच्या मुलाचा खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोनुसिंग पुरणसिंग उर्फ कन्हैय्यासिंग राजपूत (२५ रा. लोधी मोहल्ला, जालना) असे आरोपीचे नाव आहे. ही शिक्षा न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी सुनावली आहे.
१६ एप्रिल २०१९ रोजी जालना शहरातील लोधी मोहल्ला येथे कुणालसिंग राजेंद्रसिंग राजपूत (१२ ) हा घरासमोरील अंगणात खेळत होता. तेवढ्यात आरोपी सोनूसिंग तेथे आला. आरोपी व त्याच्या पत्नीमध्ये झालेले भांडणे हे कुणालसिंग याच्या आईने भडकावल्याचा गैरसमज सोनूसिंग याच्या मनात होता. त्याने कुणालसिंगच्या पोटात चाकूने वार केले. त्यानंतर कुणालसिंग याला आधी जालना, त्यानंतर औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १९ एप्रिल २०१९ रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कुणालसिंगच्या पोटात असलेला चाकू डॉक्टरांनी काढला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून चाकू जप्त केला. या प्रकरणी मयताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केेले. सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात मयताचे वडील राजेंद्रसिंग राजपूत, प्रत्यक्षदर्शी गोपालसिंग मेघासिंग राजपूत, शवविच्छेदन करणारे डॉ. नितीन एस. निनाद, पोलीस अनिल काकडे, व्हि. एस. थोटे, एन. जी. बनसोडे, तपासिक अंमलदार व्ही. आर. जाधव यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
आरोपीतर्फे बचावाचा साक्षीदार म्हणून लोधी मोहल्ला येथील त्याचा मित्र किरण गारेगावकर यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्याचा उलट तपास फिर्यादीतर्फ सरकारी वकील ॲड. वर्षा मुकीम यांनी घेतला. न्यायालयाने सरकार पक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेवून आरोपीला जन्मठेप व एकूण पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील वर्षा मुकीम यांनी काम पाहिले.