लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना औद्योगिक वसहातीत पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे शेंद्रा एमआयडीसीतून येणारे पाणी जालन्यात अत्यल्प देण्यात येत असून, बीयरच्या कंपन्यांना मात्र, ऐन दुष्काळातही मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज जालन्यातील स्टील उद्योग तर गेल्या सहा महिन्यांपासून टँकरच्याच पाण्यावर अवलंबून आहे. तर जालना एमआयडीसीला दररोज एक ते दीड एमएलडी एवढेही पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.जालन्यातील उद्योग, व्यवसायामुळे दुष्काळात अनेकांना रोजगाराची संधी मिळत आहे. चंदनझिरा भागात असलेल्या कामगार वस्तीत आता किरायाने घर मिळणे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे आठ ते दहा तास काम राबणाऱ्या कामगारांना एमआयडीसीकडून तहान भागवण्यासाठी लागणारे पाण्ीही पुरवले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.आज जालना शहरात जवळपास लहानमोठे मिळून ३०० पेक्षा अधिक उद्योग आहेत. यात जवळपास दोन हजारपेक्षा अधिक दररोज आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी जातात. परंतु पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेकजण हे घरूनच पाण्याची बाटली सोबत आणतात. परंतु कडक उन्हामुळे सोबत आणलेले पाणी पिण्यायोग्य राहत नाही.जालना एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी ३०० कोटी रूपयांची योजना मंजूर झाली होती. परंतु ती अद्यापही कागदावरच आहे. त्यामुळे शेंद्रा एमआयडीसीतून मिळणाऱ्या पाण्यावरच जालन्यातील उद्योगांना अवंलबून राहावे लागत आहे.त्यासाठी एमआयडीसीच्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयाशी संपर्क साधूनही काहीच फरक पडला नसल्याचे उद्योजकांनी सांगितले.बीअर कंपन्यांना मुबलक पाणीजालन्यातील कामगारांना पिण्यासाठी हवे असलेला पाणीपुरवठा होत नाही, तर दुसरीकडे चिकलठाणा आणि वाळूज येथील बीअरचे उत्पादन करणा-या कारखान्यांना मात्र, अद्याप पाणी कपातीचा फटका बसला नाही. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे. आज जालन्यातील उद्योजकांना दररोज किमान एक हजार रूपयांचे जारचे पाणी विकत घेऊन ते कामगारांना पिण्यासाठी पुरवावे लागत आहे.
बीअर कंपन्यांना पाणी; कामगार तहानलेलेच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:47 AM