लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल तक्रारीच्या सुनावणीनंतर जिल्ह्यातील ४८ सावकारांकडील २७ हेक्टर ८३ आर. जमीन शेतकऱ्यांना परत मिळाली आहे. महाराष्ट्र सावकारकी अधिनियम २०१४ लागू झाल्यापासून सावकारकीविरूद्ध आजवर तब्बल ३२४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील २१५ प्रकरणात कारवाई पूर्ण झाली आहे.शासनाने दिलेले खरीप, रबी हंगामातील कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणा-या राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. शेतातील कामे, मुला-मुलींचे शिक्षण असो किंवा दवाखान्याचा खर्च असो विविध कामासाठी लागणारा पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी सावकाराच्या दारात जातो. मात्र, हे सावकार दिलेल्या कर्जावर भरमसाठ कर्ज लावून शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करीत असून, शेतजमिनीची लूटही करीत आहेत. अशा सावकारांना कंटाळलेल्या ३२४ शेतक-यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे महाराष्ट्र सावकारकी अधिनयम २०१४ अंतर्गत तक्रारी नोंदविल्या होत्या. पैकी २१६ प्रकरणांची कारवाई पूर्ण झाली आहे. यातील १६८ प्रकरणात तथ्य नसल्याचा अहवाल चौकशीनंतर समोर आला. तर ४८ प्रकरणात सावकारकी सुरू असल्याचे समोर आले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झालेल्या सुनावणीनंतर आजवर २७ हेक्टर ८३ आर जमीन संबंधित सावकाराकडून शेतक-यांना परत करण्यात आली आहे. तर १०८ प्रकरणात तालुकास्तरावर चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सावकारकीला लगाम लावण्यासाठी दाखल होणा-या तक्रारींचा वेळेत निपटारा व्हावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.तक्रार : पोलीस ठाण्यात दाखल ८ गुन्ह्यांत १३ सावकार आरोपीजिल्हा उपनिबंधक कार्यालयात झालेल्या सुनावणीनंतर दोषी असलेल्या १३ सावकारांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, तालुकास्तरावर प्रलंबीत असलेली प्रकरणेही तातडीने मार्गी लावून अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवालानंतर सुनावणी घेऊन ही प्रकरणे निकाली काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले.सावकारकीसाठी अर्ज सुरूचपरवाना घेऊन सावकारकी करणाºयांची संख्याही जिल्ह्यात मोठी आहे. प्रत्येक वर्षी परवाना नूतनीकरण करण्यासाठी सावकारांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गर्दी होते. विशेषत: जालना शहरासह तालुक्यात सर्वाधिक परवानाधारक सावकार आहेत.तक्रारीसाठी पुढे येण्याची गरजदुष्काळाने होरपळणा-या शेतक-यांची सावकार राजरोस लूट करीत आहेत. मात्र, अनेकांकडे शेतक-यांच्या जमिनी, घरे गहाण आहेत. त्यामुळे भीतीपोटी अनेक शेतकरी, मजूर तक्रारी करत नाहीत. अशा पीडितांनी सावकारकीविरूध्द तक्रारी नोंदविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या गळ्यात सावकारकीचा फास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:21 AM