जालना : चार कोटी रूपयांच्या खंडणीसाठी मालकाच्याच मुलाचे ड्रायव्हरने भावासह मित्रांच्या मदतीने अपहरण केल्याचे गुरूवारी उघडकीस आले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चालकासह तिघांना बुधवारी मध्यरात्री अटक केली आहे. अक्षय अंकुश घाडगे, अर्जुन अंकुश घाडगे (दोघे रा. बारसवाडा, ता. अंबड) व संदीप आसाराम दरेकर (२६, रा. वाल्हा, ता. बदनापूर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. तर अन्य एकजण फरार आहे.
अक्षय हा शहरातील व्यापारी महावीर गादीया यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामाला आहे. गादिया हे मोठे व्यावसायिक असून, त्यांची लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याची माहिती अक्षयला होती. त्याने ही बाब त्याचा भाऊ व अन्य दोन मित्रांना सांगितली. त्यानंतर संशयित आरोपी अर्जुन घाडगे व संदीप दरेकर या दोघांनी आठ दिवसांपूर्वी महावीर गादिया यांच्या दुकानात खात्री केली. त्यानंतर त्यांनी अपरहणाचा कट रचला.
कटानुसार बुधवारी साडेबारा वाजेच्या सुमारास चालक अक्षय घाडगे हा स्वयंम गादिया याला घेऊन पोद्दार शाळेतून बाहेर पडला. त्याचवेळी त्याने मित्रांना इशारा केला. सिंदखेडा राजा चौफुली परिसरात आल्यावर त्यांनी दुचाकी आडवी लावून स्वयंमचे अपहरण केले. त्यानंतर महावीर गादिया यांना फोन करून ४ कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली. परंतु, प्लॅन फसल्याचे कळताच, प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी उतरले. ड्रायव्हर व स्वयंम यांना शहापूर येथे सोडण्यात आले.
पोलिसांनी ड्रायव्हर अक्षय घाडगे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला अधिक विचारपूस केली असता, त्याने भावासह मित्रांच्या मदतीने अपहरण केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ एकाला खरपुडी व दुसऱ्याला मंठा चौफुली परिसरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी अन्य एकजण फरार आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोउपनि. प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, कृष्णा तंगे, फुलचंद हजारे, विनोद गडदे, जगदीश बावणे, रूस्तुम जैवाळ, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे, रंजित वैराळ, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, दत्तात्रय वाघुंडे, सुधीर वाघमारे, देविदास भोजने, भागवत खरात, किशोर पुंगळे, कैलास चेके, योगेश सहाने, सचिन राऊत, रवी जाधव, धम्मपाल सुरडकर, रमेश पैठणे, शडमल्लू यांनी केली आहे.