लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी संपर्क साधला, यावेळी त्यांची आणि माझी अहमदाबादमध्ये चर्चा झाली. तत्कालीन काँग्रेसचे सरकार हे भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी असल्याच्या मुद्यावरून त्या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे मी शेतकरी हितासाठी त्यांच्या सोबत गेलो, मात्र, त्यांनी विश्वासघात केला. हाच कित्ता खा.राहुल गांधी करतील तर त्यांचीही साथ लगेच सोडू असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.शेतकरी सन्मान यात्रेनिमित्त खा. राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे शनिवारी जालन्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आज केंद्र व राज्य सरकार हे केवळ घोषणा करणारे सरकार आहे. स्वातंत्र्यानंतर आपण पहिल्यांदाच एवढी चांगली सुश्राव्य भाषणबाजी ऐकल्याचे सांगून, शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी हे लोकशाहीला मानणारे नेते म्हणून सर्वत्र मिरवत असतात, आता त्यांच्यातील खरेपणा तेव्हाच सिध्द होईल, ज्यावेळी ते मे महिन्याच्या शेवटी देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक आठवड्याचे संसदेचे अधिवेशन भरवतील. या प्रमुख मागणीसाठी १० मे रोजी देशातील सर्व जिल्हाधिकाºयांना स्वाक्षºयांचे निवेदन देण्यात येऊन ही देशाची मागणी असल्याचे दर्शविण्यात येणार आहे.यावेळी त्यांनी दुधाचे भाव घरण्यामागे केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. आपण तीन महिन्यांपूर्वी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याची पूर्वसचूना दिली होती, मात्र, त्याकडे गंभीरतेने घेतले नसल्यानेच आज क्षमतेपेक्षा जास्त दुधाचे उत्पादन झाल्याचे ते म्हणाले. तसेच कमी दर देणा-या दूध संघावर कारवाई करणार असे सरकार सांगत असले तरी, तसा कुठलाच कायदा नसल्याने ही एक प्रकारची धूळफेक असल्याचे शेट्टी म्हणाले. नोटाबंदी, जीएसटीमुळै शेतक-यांचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. बँकाकडून शेतक-यांना कृषीकर्ज देण्यातही टोलवा-टोलवी केली जात आहे. गेल्यावर्षी ४२ हजार कोटी रूपयांचे कृषीकर्ज दिले होते, ते यंदा केवळ २२ हजार कोटी रूपयेच वाटप झाल्याचे सांगण्यात आले.संसदेचे अधिवेशन बोलावण्यास पंतप्रधान मोदी यांना शेतकरी भाग पाडतील, त्या अधिवेशनात शेतक-यांच्या उत्पादनाला दीडपट हमी भाव आणि कर्जमुक्ती हे दोन विधेयके मांडणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी रविकांत तुपकर, साईनाथ चिन्नादोरे, सुरेश गवळी यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती.शेतक-यांच्या हितासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आपण जोडले गेलो. मात्र ज्यावेळी शेतक-यांना दीडपट हमीभाव देण्याच्या मुद्यावरून जे घुमजाव केले त्यावेळपासून आपण त्यांच्या विरोधता थेट भूमिका घेतली. एकूणच भविष्यात काँग्रेसचे सरकार आले आणि या पक्षानेही अशीच भूमिका घेतल्यास राहुल गांधीची साथ सोडून देऊन शेतकºयां सोबत राहणार असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.टोपे, गोरंट्याल भेटस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी हे जालन्यातील विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राजेश टोपे, जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्यासह माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी भेट घेतली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.
मोदींकडून विश्वासघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 1:11 AM