जालना : मागील काही वर्षात यंदा प्रथमच जून महिन्याच्या प्रारंभी निसर्ग शेतकऱ्यांवर मेहरबान झाला होता. परंतु, बियाणे उत्पादक कंपन्यांनी सोयाबीनचे निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागलेली आहे. दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश कृषी विभागाने काढला होता. परंतु, आजवर जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतपतच शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणांची भरपाई मिळालेली आहे.
यंदा जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यात हजारो शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने त्याची उगवण क्षमता चांगली झाली नाही. माहितीच्या अभावीपोटी केवळ २ हजार ७४० शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण झाली नसल्याची तक्रार केली होती. यात आजवर महाबीजच्या वतीने ७८ शेतकऱ्यांना ४ लाख १५ हजार १४० रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर काही खासगी कंपन्यांनी ५८ बियाणांच्या बॅगांचे वाटप करून ८७ शेतकऱ्यांना ३ लाख २५ हजार ६१० रूपयांची भरपाई दिली आहे. तर काही प्रकरणे प्रक्रीयेमध्ये असून, तेही लवकरच निकाली निघतील, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
या बियाणांसंदर्भात तक्रारी दाखलयंदा जिल्ह्यात कापसाची लागवड ३ लाख ८ हजार २६८ हेक्टरवर झाली होती. तर मका ४२ हजार १७३ तर सोयाबीनचा पेरा १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर झाला होता. परंतु, अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले होते. याबाबत २ हजार ७४० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.
बियाणे कंपन्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल सोयाबीनचे बोगस बियाणे विकल्याचा ठपका ठेवत आजवर जिल्ह्यात १५ कंपन्यांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सालासर कृषी ग्रोअर कंपनी, पिपलीयामंडी (म.प्र), पतंजली बायो रिसर्च, उत्तराखंड, अंकुर सिडस् प्रा.लि., यशोदा हायब्रीड सिडस् प्रा.लि. वर्धा, इगल सिडस ॲण्ड बायोटेक लि. इंदौर, ग्रीन गोल्ड सिडस् कंपनी औरंगाबाद, दिव्य क्रांती सिडस् कंपनी जालना, हरित क्रांती सिडस् कंपनी देऊळगाव राजा, मे. ओस्वी सिडस् इंदाैर, म. प्र, सागर ॲग्रो इनपूट जगदेवगंज, आलोटे, रतमाल म.प्र. आदी कंपन्यांचा समावेश आहे.
सोयाबीनच्या बोगस बियाणांसदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. यातील काही शेतकऱ्यांना महाबिजच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी दिलेल्या पावतीवरील लॉट नंबर मॅच होत नाही. त्यामुळे बियाणांची भरपाई देण्यास विलंब लागत आहे. तसेच अनेक कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. - बी. आर. शिंदे, कृषी अधिकारी