लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्याचे आराध्य दैवत असलेल्या आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक आषाढी एकादशी निमित्त परंपरागत उत्साहात काढण्यात आली. सकाळी ९ वाजता निघालेली ही पालखी रात्री उशिरा मंदिरात पोहचली. विशेष म्हणजे यावेळी पालखी सोबत तीन ढोल पथकांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. भज.. गोविंदम्...भज.. गोपाल स्वामी आनंदी दीनदयाळ याच्या जयघोषाने जालना शहर दुमदूमून गेले होते.प्रारंंभी सकाळी चार वाजता आनंदीस्वामींच्या समाधीस महाअभिषेक करण्यात आला. पालखी बांधण्याचे काम मध्यरात्रीपासूनच सुरू झाले होते. सकाळी मंदिरा बाहेर पालखी येण्या आधीच महिलांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पालखी मार्गावर अनेक घरासमोर सडे-रांगोळ्यांनी रस्ता सजविण्यात आला होता. परपरांगत वाजंत्री, ढोलताशांसोबतच टाळ-मृदुगांच्या निनादाने वातावरणात वेगळ्या प्रकारचा उत्साह दिसून आला. सकाळी रिमझिम पावसाच्या फवाऱ्यांनी वारकºयांचा उत्साह द्विगुणित केला होता.पालखी समोर मल्लखांबावर शालेय विद्यार्थ्यांसह युवकांनी जी अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिक सादर केली. त्याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वरंक्षणासाठी काठी खेळण्याच्या आकर्षक चित्तथरारक प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. लेझीमचा ताल आणि ढोल ताशांच्या गगनभेदी परंतू तेवढ्याच कर्णमधुर गर्जनेने यंदा पालखित मोठा उत्साह दिसून आला. ढोल पथकातील युवकां प्रमाणे युवतींनीही त्यांच्या तोडीस तोड साथ देऊन भगवे फेटे परिधान करून आम्हीही कुठे मागे नाहीत असा संदेश यातून दिला. लयबध्द ढोल वादनाने सर्वांची मने जिंकली.आषाढी एकादशी निमित्त जुना जालना भागात मोठी यात्रा भरली होती. रिमझिम पावसाच्या उपस्थितीत टाळ मृदंगाच्या गजराने अवघे जालना भक्ती रसात रंगून गेले होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आनंदी स्वामींच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी देखील भाविकांनी रांगा लावल्या होत्या.या आषाढी यात्रे आधी जवळपास पेरण्या उरकल्याने पंचक्रोशीतील शेतक-यांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.मुस्लिम समाजाच्या वतीने पालखीचे स्वागतआनंदी स्वामींच्या पालखीचे स्वागत जुना जालना भागातील बाजारचौकी पोलीस ठाण्या समोर मुस्लिम बांधवांनी केले. यावेळी आनंदी स्वामी मंदिराचे विशवस्त रमेश महाराज ढोले यांचा यावेळी शालश्रीफळ देऊन इक्बाल पाशा, नगरसेवक शाह आलमखान, माजी नगरसेवक अयुबखान आदींनी केले. याचवेळी माजी आ. अरविंद चव्हाण यांनीही मोरंडी मोहल्ला येथे पालखीचे स्वागत केले.
भज गोविंदम... भज गोपाल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:14 AM