- दीपक ढोले
जालना : वाहनांचे एकाहून एक मॉडेल्स बाजारात येत असतानाच त्यांना शोभेशी नंबर प्लेट असावी, यासाठी फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ वाढली आहे. यामुळे नंबर प्लेटसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या नियम केवळ कागदावरच असल्याचे वास्तव आहे.
नवीन गाडी खरेदी करताच प्रादेशिक परिवहन विभागाकडे तिची नोंदणी करून नंबर दिला जातो. या नंबरवरून त्या गाडीची विभागाकडे नोंद असते व गाडीवर नंबर लिहिण्यासाठी विभागाने काही नियम ठरवून दिले आहेत. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या नियमांना तोडून जिल्हाभरात वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जात असल्याचा प्रकार चांगलाच फोफावला आहे. उघडपणे सुरू असलेला हा प्रकार बघूनही प्रादेशिक परिवहन विभाग तसेच वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष आहे.
वाहनाच्या नंबर प्लेटवर विभागाने ठरवून दिल्यानुसार, फक्त नंबर टाकायचे आहेत. मात्र येथे नंबर प्लेटवर क्रमांक सोडून वाहनधारक कार्यरत असलेल्या विभागाचे नाव, वाहनधारकाचे किंवा त्याच्या परिवारातील सदस्यांचीच नावे दिसून येतात. हा प्रकार पूर्ण जिल्ह्यातच असून, सर्रासपणे नियमांची मोडतोड होत आहे. मात्र, या वाहनधारकांना सोडून प्रामाणिक वाहनधारकांना विविध नियमांचा धाक दाखवून दंडित केले जात आहे. त्यामुळे संबंधित पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
याबाबत मोटार वाहन निरीक्षक पी. बी. काटकर यांनी सांगितले की, परिवहन विभागाकडून फॅन्सी नंबरप्लेट लावणा-या वाहनधारकांना २०० ते ५०० रूपयांचा दंड आकारला जात आहे. दंडात्मक कारवाई नंतरही नंबर प्लेट न बदल्याचे आढळून आल्यास त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात येईल.