लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शनिवारी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी शहरातून काढण्यात आलेल्या मुख्य मिरवणुकीत ‘भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे...’ आदी भीम गीतांसह जय भीमच्या घोषणांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला. शहरात भीमसागर उसळल्याने वातावरण भारावून गेले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शनिवारी सकाळपासून विविध पक्ष, संघटना, शाळा, महाविद्यालयांमध्ये अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी शहरातील गांधी चमन चौकातून संविधान रॅली काढण्यात आली. यावेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी. आ. कैलास गोरंट्याल, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, संविधान रॅलीचे संस्थापक दिनकर घेवंदे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विजय बनकर, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, कल्याण दळे, भीमराव डोंगरे, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, बी. एम. साळवे, कल्पना त्रिभुवन, धर्मा खिल्लारे आदींची उपस्थिती होती. मस्तगड येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. याठिकाणी विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अभिवादनाचा कार्यक्रम दिवसभर सुरू राहिला. जयंतीचा खरा उत्साह सायंकाळी मुख्य मिरवणुकीत पहायला मिळाला. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार बिपीन पाटील, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, एकबाल पाशा, महेंद्र रत्नपारखे, अंकुशराव राऊत, अॅड. बी.एम. साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिचन बारी, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, महादेव राऊत, यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत पाणीवेस भागातून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. विविध भागांतून आलेली वाहने मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली. मिरवणुकीत तरुणाईसह महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. शहरातील मुख्य रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीचा उत्साह पहायला मिळला. मिरवणुकीतील नागरिकांना मराठा महासंघाच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले.पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, आ. राजेश टोपे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे आदींनी शहरातील मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भीमा तुझ्या जन्मामुळे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:59 AM