भोकरदन: मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही भोकरदन बाजारपेठ कडकडीत बंद आहे. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेऊन सर्व रस्त्यावर टायर जाळून वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे भोकरदन- जालना, भोकरदन- सिल्लोड, भोकरदन- बुलढाणा, भोकरदन- जाफराबाद- चिखली या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जालना रोडवरील डावरगाव पाटीजवळ कालपासून अनेक ट्रक रस्त्यावर उभ्या आहेत. त्यांच्या चालकांना जेवणाची व्यवस्था आंदोलकांनी केली आहे.
आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज पाटील जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याला भोकरदन शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फुर् पणे पाठींबा दिला आहे. सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी पासून आंदोलक आक्रमक झाले आहेत. आजही सकाळपासून आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.आंदोलकांनी अनेक ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको केला. ग्रामीण रुग्णालय समोर, जाफराबाद रोड, सिल्लोड रोडवर सुध्दा टायर जाळण्यात आले आहे. केवळ रुग्णवाहीकाला रस्ता करून दिला जात आहे. शहरात सर्वत्र शुकशुकाट असून शंभर टक्के बाजारपेठ बंद आहे. शहरात पोलिस अधिकारी सतर्क होते उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे, सपोनि बालाजी वैद्य यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक विजय आहेर, युवराज पाडळे बजरंग कोटूबरे यांच्यासह पोलिस कर्मचारी तैनात आहेत.
तरुणांचे उपोषण सुरूशहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ केशव जंजाळ, सुरेश तळेकर, विकास जाधव या तरुणांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण ला प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, 31 रोजी ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दिला आहे तर भोकरदन वकील संघाने सुध्दा आज या ठिकाणी येऊन उपोषणाला पाठींबा दिला आहे.
21 तरुणांनी केले मुंडणतालुक्यातील तळणी येथील 21 तरुणांनी 31 रोजी सकाळी उपोषणाला भेट देऊन सरकारचा निषेध करण्यासाठी आपल्या डोक्यावरील केस काढून मुंडण करून निषेध केला आहे या तरुणांमध्ये संजय वाघ, राजू गायके, हिम्मत गायके, श्रीराम गायके, आकाश गायके, जगन गायके, शिवाजी वाघ, द्यानेश्वर सहाणे, शिवाजी पुगळे, द्यानेश्वर गायके, केतन वाघ, अंकुश वाघ, विवेक वाघ, विठ्ठल गायके, भैय्या वाघ यांच्यासह अनेक तरुणांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला आहे.
सरपंचांनी दिला राजीनामा तालुक्यातील कोळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुसयाबाई नानाराव गावंडे यांनी मराठा आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा गटविकास अधिकारी गजानन सुरडकर यांच्याकडे दिला असून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली आहे यावेळी उपसरपंच विविध कार्यकारी सहकारी संस्था चे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.