फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यातील पशूंवर उपचार करण्यासाठी राज्य शासन व जिल्हा परिषद अशा दोन विभागामार्फत कामकाज करण्यात येते. मात्र भोकरदन तालुक्यातील राज्य शासनाच्या भोकरदन शहरासह तालुक्यातील सात पशु चिकित्सालयात जनावरांवर उपचार करण्यासाठी कर्मचारीच नसल्यामुळे भोकरदन येथे औषधोपचार करण्याची जबाबदारी चक्क सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यावर येऊन ठेपली आहे़भोकरदन - जालना रस्त्यावर राज्य शासनाच्या वतीने तालुका लघु पशु सर्व चिकित्सालयाची इमारत दोन कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च करून बांधली आहे. शिवाय जनावरांच्या शस्त्रक्रियेसह सर्व उपचार करण्याची यंत्रसामुग्री या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून धूळ खात पडून आहे़ त्याचप्रमाणे तालुक्यातील धावडा, वालसावंगी, सिपोरा बाजार, आव्हाना, केदारखेडा, दानापूर येथील राज्य शासनाच्या श्रेणी दोनच्या सर्वच चिकित्सालयातील पदे रिक्त आहेत. त्यामध्ये धावडा, आव्हाना, केदारखेडा येथे एकच शिपाई कार्यरत आहे. भोकरदन सारख्या तालुक्याच्या ठिकाणी सहायक आयुक्त पशुधन, आदी अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने पशुपालकांचे मोठे हाल सुरू आहेत. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहेत.जिल्हा परिषदेचे पशुधन विकास अधिकारी डॉ. रोहित धुमाळ यांनी सांगितले की, मी चार वर्षापासून येथे आलो. तेव्हापासून राज्य शासनाची सर्वच पदे रिक्त आहेत. केवळ बी़जी़ रावते हे एकमेव कर्मचारी कार्यरत होते. मात्र ते सुध्दा सेवानिवृत्त झाले आहेत़ त्याच प्रमाणे इमारत व यंत्रसामग्री हाताळण्यासाठी अधिकारी, कर्मचारीच नााहीत. शिवाय आम्ही त्या इमारतीचा किवा यंत्रसामुग्रीचा वापर करू शकत नाही, असे सांगितले. जुन्या इमारतीमध्ये आमचे कार्यालय सुरू असल्याचे सांगण्यात आले. या महत्त्वाच्या दवाखान्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
भोकरदन तालुका लघु पशुचिकित्सालयाचा कारभार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:56 AM