- फकिरा देशमुखभोकरदन: पुरातन वारसा स्थळांची निगा राखणे गरजेचे असते. परंतु, येथून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आलापूर शिवारातील तुकाई लेणी नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. लेणीत पाणी साचल्याने येथील मूर्ती जीर्ण झाल्या आहेत. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तुकाई लेणीत पावसाळ्यात चार महिने ३ ते ४ फूट पाणी साचत असल्याने येथील लेणीला धोका निर्माण झाला आहे. पाणी जाण्यास वाट नसल्याने मूर्ती जीर्ण होत आहेत. लेणीला गळती सुद्धा लागली असून दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे लेणीकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.
केळना नदीच्या काठावर आलापूरच्या शिवारात तुकाई लेणीसह रामेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आहेत. मात्र पर्यटकांना ही लेणी पाहणे जिकिरीचे बनले आहे. लेणीमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने येथे जाणे अशक्य झाले आहे. यामुळे पर्यटकांना आत जाऊन लेणी पाहता येत नाही. शिवाय लहान मुलांनाही लेणी पाहणे धोकादायक झाले आहे.
विद्यापीठाकडून उत्खनन१९३५ मध्ये येथील लेणी प्रकाशझोतात आली. १९७३ मध्ये तत्कालीन मराठवाडा आणि नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी येथे उत्खनन केले होते. या लेण्या दुहेरी मंडपात आहेत. बाहेरच्या बाजूला शिव आणि पार्वतीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या मूर्तींच्या शैलीवरून त्या राष्ट्रकुलाच्या काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी येथे थांबले असल्याची आख्यायिका आहे. लेणीच्या जवळच केळना नदीच्या काठावर रामेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. येथे महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते.
एका कर्मचाऱ्याची नियुक्तीपुरातत्त्व खात्याने येथे एका पहारेकरी कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. मात्र, तो कर्मचारी नियमित येथे हजर राहत नाही. लेणीतील पाणी उपसा करून जीर्ण होत असलेल्या मूर्ती व लेणीचा बचाव करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. परतीच्या पावसामुळे केळना नदीला मोठा महापूर आला होता. सद्य:स्थितीतही नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सुरू आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाणी झिरपून या लेणीमध्ये येत आहे. पाणी बाहेर काढता येत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून या लेणीतील मूर्ती पाण्यात आहेत.
दुरुस्तीसाठी परवानगी मागितली केळना नदीला पूर असल्यास पाणी लेणीच्यामध्ये येते. जोपर्यंत नदीचे पात्र वाहत असते तोपर्यंत लेणीत पाणी झिरपते. त्यामुळे मूर्ती जीर्ण होत आहेत. लेणीची गळती थांबविण्यासाठी वरिष्ठांना पत्र दिले आहे. दुरुस्तीसाठी निधीला मंजुरी मिळालेली नाही.- सुरेश इंगळे, पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी