जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आंदोलन शांततेत सुरु असताना पोलिस तिथे का पोहचले असा सवाल अनेकजण उपस्थित करत होते. यावर अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होती, त्यामुळे आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने आंदोलनस्थळी गेल्याचे म्हंटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसले होते. १ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पोलिस त्यांना आणण्यासाठी गेले होते. त्याचवेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. याचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यानंतर या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. तर अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे आणि डीवायएसपींच्या बदलीच्या सूचना दिल्या आहेत.
...म्हणून आम्ही आंदोलनस्थळी गेलो दरम्यान, लाठीचार्जवर अप्पर पोलीस अधीक्षक खाडे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. खाडे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांचे पथक घेऊन अंतरवाली सराटी येथे गेलो, अशी माहिती दिली.