जालना : शहरात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोऱ्या रोखण्याचे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. असे असतांना रविवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास चोरीला गेलेल्या दुचाकीचा महिला पोलीस अधिकाऱ्यांनी अवघ्या तासाभरात शोध लावला.
शहरातील रेल्वेस्थानक रोडवरील निसर्ग गार्डन या कॉलनीमध्ये रविवारी रात्री ३ वाजेच्या सुमारास शिंदे यांची घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्याने चोरुन नेली. यावेळीच शिंदे यांना जाग आल्याने त्यांना दुचाकी चोरी गेल्याचे समजले. त्यांनी लगेचच याची माहिती कदीम पोलीस ठाण्याचे पोनि. संजय लोहकरे यांना दिली. पोनि. लोहकरे यांनी रात्रगस्त असलेल्या महिला पोउपनि. पल्लवी जाधव यांना माहिती दिली. जाधव यांनी घटनास्थळी जावून पाहाणी केली. त्यानंतर त्यांनी आरोपीचा शोध सुरु केला असता, चोरटा गाडी घेवून भालेनगरीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भालेनगरी येथे सापळा लावून चोरट्याचा पाठलाग केला. परंतु, अंधाराचा फायदा घेत चोरट्याने पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी सदर दुचाकी शिंदे यांच्या स्वाधीन केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संजय लोहकरे, पोउपनि. पल्लवी जाधव, कर्मचारी मुंढे, साळवे, अजगर, बोटवे, वाघमारे, डूकरे यांनी केली.