जालना शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. हे वाढते प्रमाण पाहता, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी पोलीस ठाण्यांतील सर्व डीबी पथकांना दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुचाकी चोरांची शोध मोहीम सुरू असता, पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून कुलदीप ऊर्फ जज्जा अंबादास जगधने (रा. जमुनानगर, जुना जालना) याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जवळपास २० ते २२ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन लाख ११ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, डीबी पथकाचे कर्मचारी मनोज हिवाळे, संतोष अंभोरे, किरण चेके, बाबा गायकवाड, रामेश्वर राऊत, कैलास चेके, रामलाल कांगणे, विठ्ठ्ल खार्डे यांनी केली.