फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील वडशेद येथील कृष्णा शेनफड कळम यांनी एका एकरामध्ये लागवड केलेल्या कारल्यातून दोन लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. कारल्यात घेतलेल्या खरबुजाच्या आंतरपिकातून त्यांना चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.वडशेद जुने येथील कृष्णा शेनफड कळम हे पारंपरिक पद्धतीने शेती न करता शेतात कायम नवनवीन प्रयोग करतात.या वर्षी त्यांनी गावातीलच कृष्णा भालेकर व रामदास पांडे यांचे मार्गदर्शन घेत एका एकरात जानेवारी महिन्यात एका खाजगी कंपनीच्या कारल्याची लागवड केली. पारंपरिक पद्धतीने कारला लागवड न करता अडीच बाय पाच या अंतरावर कारल्याचे वेल लावले. शेताच्या चारही बाजूने विशिष्ट अंतरावर लोखंडी पाईप रोवले. या पाईला तारा बांधून कारल्याचे वेल तारांवर चढले. ठिबक सिंचनचा वापर करत पाणी बचत केली. योग्य व्यवस्थापनामुळे कारला पीक चांगले बहरले आहे. कारल्याचे उत्पादनास सुुरुवात झाली असून, ३० ते ३५ रूपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. शेनफड दर आठवड्याला औरंगाबाद, जळगाव, अकोला येथील बाजारात कारले विक्रीस नेत आहेत. आतापर्यंत ५० ते ६० क्विंटल कारल्याची विक्री झाली असून, आणखी शंभर क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे. खर्च वजा जाता कारल्याच्या उत्पदनातून पहिल्या बहरात एक लाख रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित असल्याचे शेनफड यांनी सांगितले. पांरपिक शेतीला फाटा देत नवीन शेतीत प्रयोगशिलता आणल्यास कमी जागेतही अधिक उत्पादन मिळू शकते, हे कळम यांच्यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.
कडू कारल्याची शेती ठरली मधुर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:19 AM