- श्याम पाटीलसुखापुरी ( जालना) : घनसावंगी मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत करून सतीश घाटगे पाटील यांना ताकद देण्याचे काम भाजप करेल. तुम्ही सतीश घाटगे पाटलांना ताकद द्या. बाकी भाजप त्यांच्या मागे उभा राहील, असे स्पष्ट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४च्या विधानसभा निवडणुकीत घनसावंगी मतदारसंघात समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे हे भाजपचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप या मतदारसंघात ताकदीने लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा घनसावंगी तालुक्याच्या वतीने समृद्धी कारखान्याचे चेअरमन नेते सतीश घाटगे, भाजपचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांनी भव्य सत्कार केला. यावेळी शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार किरण पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भादरंगे, भाजपचे घनसावंगी तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश बोबडे, भाजपचे विश्वजित खरात, अनिरुद्ध झिंजुर्डे आदी उपस्थित होते.
गेल्या महिन्यात सतीश घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, ते लोकसभा लढवणार की विधानसभा हे अद्याप निश्चित झाले नव्हते. घनसावंगी तालुक्यातील जनतेमध्येही त्यांच्या निर्णयाची उत्सुकता लागली होती. अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सतीश घाटगेंना आगामी विधानसभा निवडणुकीत राजेश टोपेंविरोधात उतरविण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
घनसावंगीत १० हजार कार्यकर्त्यांचे घेणार संमेलनपुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, घनसावंगी मतदारसंघात लवकरच १० हजार कार्यकर्त्यांचे मोठे संमेलन घेणार असून, या कार्यक्रमासाठी ६ तास वेळ देणार आहे. या ६ तासांत कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून घनसावंगी मतदारसंघातील समस्या सोडविण्याचे काम करणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या ४९ योजना ज्या घनसावंगी मतदारसंघात पोहोचल्या नाहीत, त्या घाटगे पाटील यांच्या नेतृत्वातून जनतेपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.