लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अस्सल हिंदुस्थानी खेळ असलेल्या कुस्तीला राजाश्रय मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने जालन्यात १९ ते २३ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या पाच दिवसांच्या कुस्ती स्पर्धेत भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावताना एक औपचारिकता दिसून येत होती. कुठल्याच कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद या पक्षाच्या नेत्यांनी दिला नसल्याने या बाबत उलट चर्चेला उधाण आले आहे.गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढणार म्हणून अप्रत्यक्षपणे जाहीर केले आहे. अद्याप त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी, त्यांनी दोन महिन्यांपूर्वी भोकरदन येथे पत्रकारांशी बोलातना लोकसभा लढण्याचे संकेत दिले होते.यावरूनच आता शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय व्दंद्व सुरू आहे. गेल्या चारही निवडणूकीत खा. दानवे यांनी काँग्रेसचा पराभव केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या समोर जर खोतकर यांनी उमेदवारी भरल्यास ही लढत तुल्यबळ होणार आहे. त्यातच खोतकर आणि दानवे यांचे राजकीय संबंध हे जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सारखेच आहेत. त्यातच अर्जुन खोतकर हे पैठणचे जावई असल्याने त्यांचे पाहुणे देखील त्या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत.विशेष म्हणजे कुस्ती स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेवर नजर टाकली असता, पैठणचे आ. संदीपान भुमरे, सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांचा आवर्जून उल्लेख आहे. त्यातच संदीपान भुमरे यांनी उद्घाटन सोहळ्यास हजेरी लावली होती. उद्घाटन सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हजेरी लावली. परंतु बक्षीस वितरण कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असल्याचे संयोजकांनी जाहीर केले होते. परंतु ते आले नाहीत. यामागे देखील भाजपचे राजकारण असल्याची चर्चा आहे.कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे देखील गोंदिया येथे गेल्याने त्यांची अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय ठरली. असे असले तरी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बक्षीस वितरणास ऐन वेळी हजेरी लावून शरद पवारांचा शुभेच्छा संदेशही वाचून दाखवला.यावेळी आ. राजेश टोपे हे मात्र उद्घाटन आणि बक्षीस वितरणास आवर्जून उपस्थित होते. विशेष म्हणजे ही कुस्ती सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष एक दिवस जालन्यात असतानाही ते कुस्तीच्या मैदानाकडे फिरकले नाहीत.व्यस्त कार्यक्रमांमुळे गैरहजेरीज्या दिवशी या कुस्ती स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम होता, त्या दिवशी आपले अन्यत्र पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने आपण येऊ शकलो नसल्याचे खासदार दानवेंनी सांगितले. कुस्ती हा आपला देखील आवडीचा खेळ असून, गैरहजर राहण्यामागे कुठलेच राजकीय कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.- खा.रावसाहेब दानवे, जालना
कुस्ती स्पर्धेपासून भाजप दोन हात दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 1:00 AM