जालना : एका व्यक्तीचे अर्धनग्न फोटो व्हायरल करीत साडेतीन लाख रुपये मागणाऱ्या दोन महिलांसह एका व्यक्तीविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक असलेल्या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. १९ एप्रिलपर्यंत पाेलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच फिर्यादीने महिलेच्या फोन-पेवर टाकलेले एक लाख रुपयेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
एका आयुर्वेदिक औषध विक्रेत्या महिलेने लिफ्ट मागून जगन्नाथ पांडुरंग नागरे यांच्याशी ओळख निर्माण केली. त्यांना लिव्हरच्या औषधासाठी दि. १४ एप्रिल रोजी अंबड येथील घरी बोलाविले आणि अर्धनग्न फोटो काढले. नंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत साडेतीन लाखांची मागणी केली. फोन पे खात्यावर एक लाख रुपये घेण्यात आले. परंतु, नागरे यांनी दिलेला अडीच लाखांचा चेक न वटल्याने पुन्हा पैशांची मागणी केली जात होती. यामुळे नागरे यांनी अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांनी १५ रोजी कारवाई करीत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
या प्रकरणात उषा अशोक भुतेकर (औषधविक्रेत्या), गोकर्ण पंडितराव जोशी, सुरेखा विजय पवार (तिघेही रा. अंबड) यांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान अंबड पोलिसांनी संबंधितांकडून फोन पेवर घेतलेली एक लाख सात हजारांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोउपनि. भगवान नरोडे करीत आहेत.