लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरण भरले असून, या धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी वालसावंगी शिवारातील धामणा नदीपात्रात थांबले आहे. परिणामी, या भागातील शेतकऱ्यांना नदीपात्र ओलांडण्यासाठी एका होडीचा आधार घ्यावा लागत असून, मागील २५ वर्षांपासून ही जीवघेणी कसरत सुरू आहे. विशेष म्हणजे, पुलाच्या कामाला निधी मिळालेला असतानाही ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हे काम अद्यापही रखडले आहे.वालसावंगी गावच्या शिवारातून धामणा नदी वाहते. येथून जवळच काही अंतरावर पद्मावती प्रकल्प आहे. प्रकल्पक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. परिणामी, या प्रकल्पातील बॅकवॉटरचे पाणी धामणा नदीपात्रात थांबले आहे.साधारणत: १५ फुटांपर्यंत हे पाणी थांबत असल्याने या भागातील शेतक-यांना नदीपात्र ओलांडताना जीवघेणी कसरत करावी लागते. विशेषत: या भागातील शेतकरी लोकसहभाग करून एक होडी तयार करतात. त्याला शेतरस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दोरी बांधलेली आहे. शेतकरी शेतात जाताना-येताना या होडीचा आधार घेऊन होडीतून नदीपात्र ओलांडतात. शेतक-यांची कसरत दूर करण्यासाठी या नदीपात्रावर पूल बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला.कामालाही मंजुरी मिळाली. मात्र, ठेकेदाराने निष्काळजीपणा करीत उशिराने कामाला सुरूवात केली.बांधकाम साहित्य आणले. मात्र, पाऊस झाल्याने पद्मावती प्रकल्प भरला आणि बॅकवॉटरचे पाणी धामणा नदीपात्रात थांबले. परिणामी यंदाही या भागातील शेतक-यांना जीवघेणी कसरत करीतच नदीपात्र ओलांडावे लागणार आहे.ठेकेदाराने वेळेवर काम सुरू केले असते तर शेतक-यांची जीवघेणी कसरत थांबली असती हे नक्की! आता नदीपात्रातील पाणी कमी झाल्यानंतर हे काम होणार असून, किमान त्यावेळी तरी या कामात तरी दिरंगाई करू नये, अशी मागणी या भागातील संतप्त शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांना नदीपात्र ओलांडण्यासाठी होडीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 1:00 AM