हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील वज्रखेडा येथील गिरीजा नदीवर बांधलेला कोल्हापुरी बंधारा अतिवृष्टीमुळे भरला आहे. या कोल्हापुरी बंधाऱ्यात परिसरातील अनेक पर्यटक, निसर्ग प्रेमी नौका विहार करीत असून, अनेकजण मनसोक्त पोहण्याचा आनंद लूटत आहेत.
वज्रखेड येथे गावाजवळून वाहणारी गिरीजा नदी व त्या ठिकाणी पुरातन वज्रेश्वर महादेव मंदिर आहे. त्याला लागून पंधरा वर्षापूर्वी खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून बांधलेला पहिला कोल्हापुरी बांधारा आहे. भोकरदन, फुलब्री, सिल्लोड तालुक्यातून अनेक भक्त वज्रेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. यावर्षी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे बंद केल्याने पाणीसाठा जवळपास तीन किलोमीटरपर्यंत मागे गेलेला आहे. नदीपलीकडे राहणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतातून ये- जा करण्यासाठी एक होडी आणली आहे. काम संपल्यानंतर दर्शनासाठी येणारे भाविक व निर्सगप्रेमी या पाणी साठ्यात नाैकाविहार करीत आहेत. रविवार, सोमवार व सुटीच्या दिवशी येथे येणाऱ्या भाविक, पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे मंदिराचे व्यवस्थापक देवानंद गिरी महाराज यांनी सांगितले.