फोटो
वडीगोद्री : जायकवाडीच्या डाव्या कालव्यात वाहून गेलेल्या महिलेचा गुरुवारी सायंकाळी वडीगोद्रीजवळ मृतदेह सापडला. ही घटना २२ डिसेंबर रोजी सकाळी जायकवाडी प्रकल्पाच्या दह्याळ शिवारातील डाव्या कालव्यात घडली होती.
सुषमा गणेश बर्वे (२५), असे मयत महिलेचे नाव आहे. दह्याळ येथील सुषमा बर्वे या २२ डिसेंबर रोजी सकाळी गावाच्या शिवारातील कालव्यात धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक पाय घसरल्याने त्या डाव्या कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. गोंदी ठाण्याचे कर्मचारी, नातेवाईक, युवकांनी गत तीन दिवस शोधमोहीम राबविली. ही शोधमोहीम सुरू असताना सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथील पुलाजवळ कालव्यातील विद्युत मोटारीच्या पाइपला अडकलेला मृतदेह गुरुवारी सायंकाळी दिसून आला. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हनुमंत वारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्या महिलेला बाहेर काढले. वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
एका महिलेचे वाचले प्राण
दह्याळ शिवारातील कालव्यात धुणे धुताना एक महिला वाहून गेली होती. सुदैवाने त्यावेळी ग्रामस्थ हजर असल्याने त्यांनी तिला कालव्याच्या बाहेर काढले. मात्र, २२ डिसेंबर रोजी वाहून गेलेल्या सुषमा बर्वे यांचा मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली असून, या घटनेनंतर डाव्या कालव्यात धुणे धुण्यासाठी एकही महिला गेली नाही.