लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेल्वेत बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून टीसी असल्याचा बनाव अंगलट आला असून, प्रवाशांचे तिकिट तपासत असताना रेल्वेतील खरा टीसी अवाक झाला. त्याने त्या दोघांकडे ओळखपत्राची मागणी केली असता ते गोंधळून गेले. या प्रकरणी दोन जणांविरुध्द रविवारी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक कर्मचारी हा परतूर येथील बांधकाम विभागात लिपिक म्हणून कार्यरत आहे. तन अन्य दुसरा हा खाजगी व्यवसाय करतो.लोहमार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जालना येथे वास्तव्यास असलेले राजेंद्र लक्ष्मीनारायण मुंडले आणि शेख रशीद शेख करीम हे शनिवारी नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसमधील एस. १ आणि एस. २ या बोगीत प्रवाशांची रेल्वेची तिकिटे दाखावा म्हणून मागणी करून त्यावर काहीतरी लिहित होते. त्याचवेळी रेल्वेत कार्यरत असलेले तिकीट तपासनीस या डब्यात आले असता तेथे पूर्वीच कोणीतरी टीसी म्हणून फिरत असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेचच मुंडे आणि शेख करीम यांच्यांडे ओळखपत्राची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे ते नसल्याने हे दोघेही गांगरून गेले. त्यांनी लगेच तो डबा बदलण्यासाठी पळ काढला, परंतु प्रवाशांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले.जालना रेल्वे स्थानकात रेल्वे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पोहोचली असता, तेथे यातील शेख रशीद याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु लोहमार्ग पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.या दोघांविरूद्ध जालन्यातील लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप साबळे हे करीत आहेत.
जागा मिळविण्यासाठी टीसी होणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:34 AM