जालना : एक कोटी ४१ लाख २१ हजार ४४६ रूपये किमतीच्या लोखंडी सळ्या उधारीवर घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करून मेटारोल्स इस्पात कंपनीची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम राजपूत यांनी दिली.
जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत मेटारोल्स इस्पात प्रा. लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीत लोखंडी सळ्याची निर्मिती केली जाते. २७ जानेवारी २०२१ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत संशयित सुधाकर शिवराम सुळकुडे (वय ५५), स्वप्निल सुधाकर सुळकुटे (२६, दोघे रा. कळंबा, रिंगरोड कोल्हापूर) यांनी कंपनीकडून उधारीवर वेळोवेळी १ कोटी ४१ लाख २१ हजार ४४६ रूपये किमतीच्या लोखंडी सळ्या नेल्या होत्या. काही दिवसांनंतर कंपनीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता, त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.
त्यानंतर कंपनीतील रामचंद्र ज्ञानेश्वर शिंगणे (३६) यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संग्राम राजपूत यांनी पथक तयार करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संग्राम राजपूत करीत आहेत.