लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मुर्गी तलाव परिसरातील जवाहरबाग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या दुकानांचा वाद न्यायालयात गेला आहे. त्यामुळे तेथून तूर्तास तरी पालिकेला कवडीचे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच जवाहरबाग नामशेष झाली आहे, तर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातही अभ्यासकेंद्र प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे मुखर्जी उद्यानाच्या सुशोभीकरणावर काही वर्षांपूर्वी तब्बल ३० लाख रुपयांचा निधी खर्च झालेला आहे.निजामकाळात तलाव असलेला हा भाग. नागरिकांसाठी पालिकेने याचे उद्यानात रुपांतर केले. बच्चे कंपनीसाठी खेळाचे साहित्य व हिरवळ तयार करण्यात आली. नवीन जालनेकरांचा विरंगुळा व्हावा म्हणून जवाहरबाग विकसित करण्यात आली. येथेही काही वर्षांपूर्वी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर १२ दुकाने बांधण्यात आली. दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ही जमीन शासनाची असल्याचे सांगत पालिकेचा यावरील हक्क नाकारला. आता दुकानांचा वाद हा न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हे बांधकाम पालिकेसाठी डोकेदुखीच ठरले आहे. दुसरीकडे या उद्यानाच्या बहुतांश भागावर अतिक्रमण झाले असून, यावर काहींनी पक्की घरेही बांधली आहेत. तर उर्वरित जागेवर बाजार भरवला जात आहे. उद्यान तर नामशेष झालेच; शिवाय काही जागाही पालिकेच्या हातची गेली आहे.डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळाचे एक प्रमुख केंद्र होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी खा. रावसाहेब दानवे यांच्या खासदार निधीतून २० लाख, स्थानिक आमदार निधीतून ५ लाख आणि पालिकेचा ५ लाख, असा ३० लाख रुपयांचा निधी या उद्यानाच्या सुशोभीकरणावर खर्च करण्यात आला. यात भिंत, कारंजे, आसन व्यवस्था, हिरवळ, विविध वृक्षलागवड आदींचा अंतर्भाव होता. त्याच वेळी पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी १२ गाळे बीओटी तत्त्वावर बांधण्याचे पालिका प्रशासन आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींनी निश्चित केले. हाही वाद सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे पालिका अधिका-यांनी सांगितले. अद्याप यातून पालिकेला छदामही मिळालेला नाही. पालिकेच्या मालकीच्या भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून व उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेले गाळेच आज पालिकेसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. तर काही दिवसांपूर्वी याच उद्यानात अभ्यासकेंद्र सुरु करण्यासाठी खा. दानवे यांनी २ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. याचे कामही लवकरच सुरु होणार असल्याचे समजते. त्यामुळे हे उद्यान नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
बीओटीचा नुसताच बोलबाला, उत्पन्न शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 1:10 AM