लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जालना बाजार समितीचे शाखा अभियंता रामदास हरिदास गाडेकर (५०, रा.आनंदनगर) हे जागीच ठार झाले. बाजार समिती रस्त्यावरील शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी दुपारी ही घटना घडली.रामदास गाडेकर हे सकाळी नेहमीप्रमाणे बाजार समितीत गेले होते. दुपारी शहरातील जुन्या मोंढ्याकडे कामानिमित्त दुचाकीवर (एमएच २१,एजे. ३६३८) येत होते. त्या वेळी देऊळगाव राजाकडे जाणारी औरंगाबाद- गंगाखेड बस (एमएच २० बीएल, ३९१७) व दुचाकीची बाजार समितीकडे जाणा-या वळण रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. अपघातात गाडेकर गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक बस जागेवर सोडून निघून गेला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजने, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक नाडे हे घटनास्थळी पोहोचले. राज्यमंत्री तथा बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर, जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी गाडेकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल मगरे तपास करीत आहेत.
शाखा अभियंता अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:38 AM