जालना : पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी बदनापूर तालुक्यातील काजळा येथील सरपंचाचे पती व ग्रामपंचायत सदस्यास २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने गुरुवारी ताब्यात घेतले. रंगनाथ सुभाष देवकाते (३२, रा. काजळा) असे संशयिताचे नाव आहे.
तक्रारदारास पंतप्रधान आवास घरकूल योजनेअंतर्गत १ लाख २० हजार रुपये मंजूर झाले असून, त्यापैकी १५ हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. त्यांचा ४५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता खात्यावर टाकण्यासाठी सरपंचाचे पती ग्रा. पं. सदस्य रंगनाथ देवकाते यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली. लाचलुचपत विभागाने सापळा रचून पडताळणी केली असता, ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. २० हजार रुपयांचा पहिला हप्ता पंचासमक्ष स्वीकारताना रंगनाथ देवकाते यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, पोलीस उप अधीक्षक रवींद्र डी. निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. एस. एस. शेख, पोलीस अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, गजानन कांबळे, शिवाजी जमधडे आदींनी केली आहे.