हिसोडा : अतिवृष्टीमुळे रायघोळ नदीला पूर आल्याने हिसोडा ते जळकी बाजार मार्गावरील पूल वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, पादचाऱ्यांनाही कसरत करीत वाट शोधावी लागत आहे.
भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथून जवळ असलेल्या जळकी बाजार (ता. सिल्लोड) येथे जाण्यासाठी तीन ते चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मुख्य मार्गावरील रायघोळ नदीवर पूल तयार करण्यात आला होता. जळकी बाजार, खुपटा, शिवणामार्गे खान्देशमध्ये जाण्यासाठी हिसोडा परिसरातील नागरिकांसाठी हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावरील रायघोळ नदीवरील पुलाचे काम करण्यात आले. नव्याने पूल झाल्याने या भागातील शेतकरी, वाहनचालकांसह प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला होता. परंतु, गत आठवड्यात दमदार पावसामुळे रायघोळ नदीला पूर आला आणि नव्याने बांधलेला पूल वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील चारचाकी वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. दुचाकीचालक जीव मुठीत घेऊन नदीपात्रातून वाहने काढत आहेत. शेतकरी, पादचारी नागरिकही कसरत करीतच रस्ता पार करीत आहेत. चालकांसह शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कोट
शिवणा व पिंपळगाव रेणुकाई ही मोठ्या बाजारपेठेची गावे आहेत. त्यामुळे येथे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. परंतु, आता वाहतूक बंद झाल्याने इतर मार्गांवरून प्रवास करावा लागत आहे. यात वेळ आणि पैसाही खर्च होत आहे. त्यामुळे त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी.
गणेश गोरे, चालक
चार वर्षांपूर्वीच या पुलाचे काम करण्यात आले होते. परंतु, अतिवृष्टीमुळे रायघोळ नदीला पूर आल्याने हा पूल वाहून गेला आहे. पुलावरील वाहतूक सध्या बंद पडली आहे. याचा नाहक त्रास शेतकरी, प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी.
-युसुफ तडवी, ग्रामस्थ जळकी बाजार
फोटो...........