जालना : शहरातील विविध भागांतील पथदिवे बंद आहेत. ते तातडीने सुरू करावेत म्हणून पालिकेकडे याआधीदेखील विविध प्रकारची निवेदन दिली आहेत. असे असताना पालिकेतील विद्युत विभाग याकडे दुर्लक्ष होत आहे. कचेरीरोड, पंचायत समिती मार्ग, तसेच अन्य परिसरातील पथदिवे बंद आहेत. ते सुरू नसल्याने भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत, तसेच दुचाकींमधील पेट्रोल चोरीस जाण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. याकडे पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
---------------------------------------
दहावी उत्तीर्ण सेवकांना संधी द्यावी - कांबळे
जालना : जालना जिल्हा परिषदेत अनेक सेवक हे दहावी, तसेच त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेले आहेत. त्यामुळे अशा सेवकांना आरोग्य सेवक म्हणून बढती द्यावी, अशी मागणी जालना जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दिलीप कांंबळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरताना सेवकांनाच संधी दिल्यास शासनाची मोठी आर्थिक बचत होऊ शकते, असेही म्हटले आहे. यावर निश्चितपणे विचार केला जाईल असे आश्वासन टोपे यांनी दिल्याची माहिती कांबळे यांनी दिली.
------------------------------------------
रेल्वेमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन
जालना : जालना जिल्हा ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना रेल्वेसंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात मनमाड ते नांदेडपर्यंत रेल्वेचे दुहेरीकरण करणे, नांदेड ते औरंगाबाद अशी शटलसेवा सुरू करणे, मुंबईला जाण्यासाठी आणि येण्यासाठी आणखी स्वतंत्र रेल्वे सुरू करणे यासह जालना ते खामगाव हा रेल्वेमार्ग सुरू करण्यास प्राधान्य देण्याचा मुद्दा निवेदनात नमूद केला आहे. या सर्व मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दानवे यांनी दिले.