जालना/ वडीगोद्री : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील व आंदोलकांची मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आहे तीच प्रामाणिक भूमिका सरकारची आहे. मी सर्व प्रोटोकॉल तोडून इथं आलो आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.
अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची गुरूवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेवून चर्चा केली. शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिवून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतले. मनोज जरांगे यांचा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळावा, यासाठी आहे आणि शासनाचीही तीच भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयात रद्द झालेले मराठा समाजाचे आरक्षण पुन्हा मिळावे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आरक्षण रद्द झालं तरी मुलाखती झालेल्या ३७०० मुलांना नेाकरी मिळावी, यासाठी शासनाने निर्णय घेतला. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविला.
ओबीसींना ज्या सवलती मिळतायत त्या मराठा समाजाला मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रद्द झालेलं आरक्षण मिळायला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. त्यासाठी काम सुरू आहे. शिंदे समिती काम करतेय. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास कसा आहे ते सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. झालेला लाठीहल्ला हा चुकीचा होता त्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना निलंबीत केले आहे. गावकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जात आहेत. आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे, राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, रावसाहेब जरांगे व इतरांची उपस्थिती होती.