जालना : वाढलेली वाहने आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये असलेल्या नोकऱ्या यामुळे अनेकांची पायी चालण्याची सवय मोडली आहे. धावपळीच्या युगातच शिवाय व्यायामाकडे दुर्लक्ष होत असल्याने कमी वयातच कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास अनेकांना होऊ लागला आहे.
पूर्वी कोणतेही काम असले की अनेकजण बाहेर चालत जायचे. नोकरीच्या ठिकाणी, शेतातही अनेकजण चालत जात होते. परंतु, दुचाकीसह चारचाकी वाहनांची संख्या वाढली आणि जणू पायी चालण्याची सवय मोडली. छोट्याही कामासाठी अनेक जण आज दुचाकी, चारचाकी गाड्या घेऊनच घराबाहेर पडत आहेत. धावपळीच्या युगात व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे.
या कारणांसाठीच होतेय चालणे
सध्या घराजवळील दुकानांमध्ये जाताना काही जण पायी चालतात.
कार्यालयाच्या जवळ चहा- पाण्यासाठी जातानाही पायी चालले जाते.
काही जणांचे शेत घराजवळ असते. अशा व्यक्ती पायी चालत जातात. परंतु, अनेकजण दुचाकीसह चारचाकी वाहनेच वापरतात.
हे करुन पाहा
काही मिनिटांच्या अंतरावर काम असेल तर वाहन नेण्याऐवजी चालत जाणे गरजेचे आहे.
सकाळी किंवा सायंकाळी वेळ काढून नियमित व्यायाम करावा.
व्यायाम, योगासनांसह दैनंदिन आहाराकडेही लक्ष देऊन सकस आहार घ्यावा.
म्हणून वाढलेे हाडांचे आजार
चालले नाही तर हाडाचा ठिसूळपणा वाढतो. वजन वाढते, चरबीतही वाढ होते. वजन वाढल्यामुळे हाडांवर ताण येऊन हाडांमध्ये ठिसूळपणा येतो. शिवाय चरबीतही वाढ होते. त्यामुळे नियमित सकाळी कोवळ्या उन्हात चालावे. त्यामुळे व्हिटॅमिन डी शरीरास मिळून कॅल्शिअम तयार होते.
ज्यांना पायी चालणे शक्यच नाही, त्यांच्यासाठी
अनेकांना पायी चालणे शक्य होत नाही. अशा व्यक्तींनी घरातच योगासने करणे गरजेचे आहे. शिवाय ट्रेडमिल, सायकलिंग यंत्रावरही व्यायाम करता येतो. तसेच दैनंदिन सकाळी काेवळ्या उन्हात घरासमोर किंवा घराच्या छतावर बसल्यानंतरही लाभ होतो, असे डॉ. प्रताप घोडके यांनी सांगितले.