लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे १० जूनला एका युवकाचा मृतदेह धडापासून शीर वेगळे केलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, सख्ख्या मेहुण्याने मेहुण्याचा (बहिणीच्या भावाने) बहिणीच्या नवऱ्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. हा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी तपासात पुढे आले आहे.पोलींसानी दिलेली माहिती अशी वडीगोद्री येथे सहा ते सात महिन्यांपासून वास्तव्यास असलेले केशव रामभाऊ गावडे (२५) हे गेल्या तीन ते चार दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार केशव यांच्या भावाने गोंदी पोलीस ठाण्यात दिली. ही तक्रार मिळाल्यानंतर गोंदी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून, आरोपींचा माग काढला. डाव्या कालव्यात सापडलेल्या मृतदेहाच्या शरीरावरील खुणा आणि केशवच्या भावाने तक्रारीत दिलेले वर्णन जुळत असल्याचे स्पष्ट झाल्यावरून तो मृतदेह केशवचाच असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याची माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल परजणे यांनी दिली.केशव गावडे हा वडीगोद्री येथे शिवणकाम करत होता. दरम्यान रामभाऊ लिपणे (रा. वडीगोद्री) आणि विष्णू शिंगाडे (रा. पुणे) यांनी संगनमत करून १० जूनच्या रात्री केशव गावडे याला दारू पाजून त्याचे धारदार चाकूने शीर धडापासून वेगळे करूनमृतदेह पिठोरी सिरसगाव परिसरातील डाव्या कालव्यात फेकून दिला. शनिवार (दि. १० जूनला) केशवची हत्या केल्यानंतर रविवारी (११ जून) रोजी मयताचा मेहुणा रामभाऊ लिपणे यानी केशव गावडे यांच्या भावाला संपर्क करून पाहुणे घरी पोहोचले का, असे विचारले. त्यांना बीड येथून शनिवारी १० जून रोजी बारामती गाडीत बसवून दिले. परंतु केशव घरी पोहोचला नसल्याचे घरच्यांनी सांगितले त्यावर रामभाऊ लिपणे व विष्णू शिंगाडे बारामतीला गेले.तसेच बारामतीतच राहत असलेल्या केशवच्या मावसभावाच्या घरी जाऊन मावस भावास बळजबरीने खोटे बोलण्यासाठी दबाव आणून केशव आणि आम्ही वडापाव खाऊन माझ्यासमोर एसटीने गेला असे सांग म्हणून भाग पाडले.दोन ते तीन दिवस उलटूनही केशव घरी परतला नसल्याने त्याच्या शोधासाठी केशवचे नातेवाईक बीड येथे आले. त्यांच्या सोबत रामभाऊ अशोक लिपणे आणि विष्णू शिंगाडे हे देखील होते. मात्र नंतर बसस्थानकातून या दोघांनी पळ काढला. त्यामुळे केशवच्या भावाला शंका आल्याने त्याने गोंदी पोलिसांकडे तक्रार दिली होती.यावरून पोलिसांनी रामभाऊ लिपणेला वडीगोद्री येथून त्याच्या घरातून अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केशव गावडेचा खून केल्याची कबूली देऊन दुसरा आरोपी विष्णू शिंगाडे हा बीड येथे लपल्याचे सांगितले. त्यावरून गोंदी पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीने शिंगाडेलाही गुरूवारी रात्री अटक केली.या दोन्ही आरोपींना शुक्रवारी अंबड येथील न्यायालयात हजर केले असता २१ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा तपास पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे तसेच अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शना खाली केला.
मेहुण्याने केला मेहुण्याचा खून..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:55 AM