जालना : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने सादर केलेले बजेट फसवे असून, तरतूद नसताना अनेक घोषणा यात करण्यात आलेल्या आहे. हा प्रकार म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेले गाजर असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
खा. शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांच्या प्रश्नांसाठी लढणारी संघटना असून, आगामी काळात या मुद्द्यांवर राजकारण संघटनेतर्फे केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. शेतमाल हमीभाव, स्वामीनाथन आयोगाची अमलबजावणी आदी मुद्दयांवर भाजपकडून अपेक्षाभंग केला असून, या सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आहे. आर्थिक वर्षाचे बजेट मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आरोग्य विमा, कृषी विभागासाठी भरीव तरतूद केल्याचे सांगितले. स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रांनुसार दीडपट हमीभाव देण्याचे म्हटले असले तरी ए-२ आणि सी-२ मधील तरतुदींचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे याचा प्रत्यक्ष लाभ शेतक-यांना कितपत होईल, याबाबत सांशकता आहे. बजटमध्ये संशोधनासाठी कुठलीही तरतूद नाही. कृषी विद्यापीठांत अनेक जागा रिक्त आहेत. शेतक-यांना तंत्रज्ञान पुरविले जात नाही. केवळ घोषणा करुन विकास कसा साधता येईल, असा सवालही त्यांनी केला.
मराठवाड्यात १०० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टिने सरकारकडून कुठल्याही उपाययोजना होताना दिसून येत नाही. कर्जमाफीची योजना जाहीर करुन सहा महिने झाले आहेत. त्यानंतर याचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचा एकही शेतकरी आपल्याला भेटला नसल्याचे ते म्हणाले. शेतक-यांचा सातबारा कोरा करण्यासह विविध प्रश्नांवर येत्या काळात संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्याचे खा. शेट्टी म्हणाले. पत्रकार परिषदेस वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश पोकळे, साईनाथ चिन्नदोरे, गोविंदप्रसाद मुंदडा, सुरेश गवळी आदी उपस्थित होते.
छोटे राज्य विकासाचे मॉडेल...स्वतंत्र विदर्भ राज्यास संघटनेचा पाठिंबा असून, छोटे राज्य हे विकासाचे मॉडेल होऊ शकतात. तेलंगणा, पंजाब, हरियाणा आदी राज्ये याचे उत्तम उदाहरण आहेत. म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्यास संघटनेचा पाठिंबा असल्याचे खा.शेट्टी यांनी सांगितले.
तूर विकण्याची घाई नको.. डाळवर्गीय पिकांचे उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणावर घटले आहे. शेतक-यांनी सध्या तूर व इतर डाळी विकण्यास घाई करु नये. बाजार हा पुरवठा आणि मागणी यावर चालत असतो. भाव वाढल्यानंतर शेतक-यांना आपला माल विकावा, असे आवाहन खा. शेट्टी यांनी केले.