जालना : येथील बांधकाम व्यावसायिक शंकर बिरदूराम शर्मा (रा. सकलेचानगर) यांना कॉफी पाजून बेशुद्ध करीत अपहरण करणाऱ्या कंत्राटदार जाकेर यासीन राठोड याला सदर बाजार पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. शर्मा यांची सुटका करून पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
दिवसभरापासून वडील संपर्काबाहेर असून, ते बेपत्ता असल्याची तक्रार शंकर शर्मा यांचा मुलगा कुणाल याने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी तातडीने सात जणांचे स्वतंत्र पथक नेमले. शर्मा यांचा मोबाईल स्वीचआॅफ लागत असल्याने लोकेशन मिळणेही अवघड झाले होते. पथकाने सुगावा काढत प्रथम संशयित आरोपी म्हणून कंत्राटदार जाकेर यासीन राठोड याला एमआयडीसीतून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने शर्मा यांचे अपहरण केल्याचे मान्य केले.
अपहरण करण्यापूर्वी राठोड आणि शर्मा यांची एआयडीसीत भेट झाली. दोघांनी सोबत कॉफी घेतली. त्या कॉफीत राठोड याने गुंगी येणारे काहीतरी मिसळल्याने शर्मा बेशुद्ध झाले. तातडीने राठोड याने शर्मा यांना शेंद्रा एमआयडीसीतील एका गोदामात त्यांच्या कारमध्ये बसवून डांबून ठेवले. सदरबाजार पोलिसांनी बुधवारी पहाटे ५ वाजता शर्मा यांना ठेवलेल्या ठिकाणाचा शोध घेतला.त्यावेळी शर्मा हे कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. तातडीने त्यांना जालन्यात एका खाजगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केल्याचे निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक झालकर, रूपेकर तसेच पोलीस हेड कॉन्सटेबल मगरे, जाधव, घुगे, वाघमारे, साठेवाड, गव्हाणे, तेलंग्रे तसेच महिला पोलीस कर्मचारी सातपुते, नागरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
१५ लाखांची कार जप्तच्शंकर शर्मा यांच्या अपहरण प्रकरणात जाकेर यासीन राठोड याला अटक केली आहे. त्याच्याकडून पंधरा लाख रुपयांची एक कार जप्त केली आहे. कॉफीमध्ये राठोड याने गुंगीसाठी नेमके काय मिसळले याचा शोध घेतला जात असल्याचे निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.
शेंद्रा एमआयडीसीतील गोदामात ठेवले डांबूनशंकर शर्मा यांना शेंद्रा एमआयडीसीतील एका गोदामात त्यांच्या कारमध्ये बसवून डांबून ठेवले होते.