शहागड (जि. जालना) : येथील बुलडाणा नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत गुरुवारी तीन जणांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रोख रकमेसह कोट्यवधी रुपयांचे सोने लंपास केले होते. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. यातील तिसरा आरोपी स्वत:हून पोलिसांना शरण आल्याचे सांगण्यात आले. त्याला सोमवारी अटक करण्यात आली.
गुरुवारी सायंकाळी शहागड (ता. अंबड) येथील बुलडाणा नागरी सहकारी पतसंस्थेत तीन जणांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन लाख रुपये रोख आणि जवळपास तीन कोटींचे दागिने लंपास केलेे होते. आरोपींचा तपास शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठे प्रयत्न करून याआधीच दोन आरोपींना अटक केली होती. यातील तिसरा आरोपी चरण बाळू पवार (२२, व्यवसाय खासगी चालक, राहणार वनवली, ता. महागाव, जि. यवतमाळ) हा स्वतः हून सोमवारी पहाटे एकच्या सुमारास गेवराई पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर गेवराई पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप काळे यांनी तातडीने गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना याबाबत माहिती देऊन सोमवारी सकाळी दरोडा प्रकरणातील चरण बाळू पवारला गोंदी पोलिसांच्या ताब्यात दिले.
दहा हजारांसाठी चुकीचा निर्णयआम्ही तिघेही चांगले मित्र आहोत. पुणे येथे काम करत असताना माझी ओळख मुकीम कासम आणि संदीप बबन सोळंके यांच्या सोबत झाली होती. यातील मुकीम कासिम हा कर्जबाजारी झाल्याने आम्ही सर्वांनी मिळून ते कर्ज फेडण्यासाठी बुलडाणा पतसंस्थेच्या लुटीचा प्लॅन केल्याचे चरण पवार यांनी सांगितले. या लूट प्रकरणातील केवळ दहा हजार रुपयेच आपण घेतल्याचे पवार याने पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.