लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सोशल मीडियाचा वापर वाढला आणि पोस्टातून जाणारी कौटुंबिक पत्रे जणू बंद झाली! कौटुंबिक पत्र पोहोचविण्याचे काम कमी झाले असले तरी पोस्टमनच्या खांद्यावर शासकीय कागदपत्रांचा भार वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत जालना शहरातील पोस्टमनची संख्याही अपुरी आहे. तर दुसरीकडे पोस्टात सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंन्टस बँक, पोस्ट बँक सेवेचा जिल्ह्यातील २५ हजाराहून अधिक ग्राहक लाभ घेत असून, यात ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.काही वर्षांपूर्वी दूर राहणाऱ्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचे माध्यम पत्रव्यवहार हा होता. एकमेकांची सुख, दु:खं, कार्यक्रमांचे निमंत्रण, घटना-घडामोडी आदींचा उल्लेख असणारे पत्र्यवहार अधिक प्रमाणात होत असत. मात्र, सोशल मीडियाचा वापर वाढला आणि दूर गावातीलच नव्हे तर विदेशातील नातेवाईकाही थेट संपर्कात आले. त्यामुळे आपसूकच पोस्ट कार्यालयातून होणारा कौटुंबिक पत्रव्यवहार हा कमी झाला. असे असला तरी शासकीय पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बँका, महसूल, पोलीस, न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह इतर विविध शासकीय कार्यालयातील पत्रांचा भार पोस्ट कार्यालयावर दिवसेंदिवस वाढत आहे.जालना येथील पोस्ट कार्यालयात १७ पोस्टमन कार्यरत आहेत. यात जुना जालना भागात ७ तर नवीन जालना भागात १० पोस्टमन कार्यरत आहेत. मात्र, दैनंदिन येणाºया कागदपत्रांची संख्या पाहता पोस्टमन अपुरे पडत आहेत. शहराचा वाढलेला विस्तार आणि कार्यालयावरील वाढलेला कामाचा ताण पाहता पोस्टमनची संख्या वाढविणे गरजेचे आहे.पोस्ट बँक आणि इंडिया पोस्टल पेमेंट बँकेतून व्यवहार करण्याकडे शहरी, ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. विविध बिलांचा भारणा, बचत खात्यांचा व्यवहार, मोबाईल रिचार्ज, शिषवृत्ती, मनरेगाच्या पैशांची देवाण-घेवाण, कृषी संबंधित कामे, गरजुंना तात्काळ पैसे पाठविणे, पेन्शन, डीबीटीचा लाभ आदी विविध व्यवहार या बँकेद्वारे करता येत आहेत. मोबाईलवरील अॅॅपवरूनही हे सर्व व्यवहार होत असल्याने ग्राहकांचा कल वाढला आहे. जालना येथील मुख्य पोस्ट कार्यालयासह जिल्ह्यातील १९७ शाखांमधून आजवर जवळपास २५ हजाराहून अधिक ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेणे सुरू केले आहे.