जालना : कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नसताना महिलेच्या सात-बारावर तीन लाख रुपये कर्जाचा बोजा एका मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीने चढविल्याचा प्रकार माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून उजेडात आला आहे. याबाबत सदर महिलेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून कार्यवाहीची मागणी केली आहे.
वरील प्रकाराबाबत पार्वतीबाई आसाराम आरडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पार्वतीबाई आरडे यांची घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड शिवारात जमीन आहे. त्यांचा मुलगा भगवंत आरडे यांनी शासनाच्या योजनेतून सौर ऊर्जा पंप मिळावा म्हणून अर्ज करण्याचे ठरविले. त्यासाठी नोव्हेंबर २०२०मध्ये आईच्या नावे असलेल्या जमिनीचा सात-बारा उतारा काढला, तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. उताऱ्यावर नगर जिल्ह्यातील एका मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटीच्या कुंभार पिंपळगाव शाखेने तीन लाख रुपयांचा बोजा चढविल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर पार्वतीबाई व भगवंत आरडे यांनी मल्टीस्टेट सोसायटीच्या कुंभार पिंपळगाव शाखेत जाऊन चौकशी केली, तेव्हा तेथील शाखा व्यवस्थापकाने संस्थेच्या संचालक मंडळाने जमिनीवर बोजा टाकण्यास सांगितल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर आरडे हे संचालकांना भेटले, तेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यावर माहिती अधिकारात अर्ज करून माहिती मागविली, यात अनेक जणांच्या जमिनीवर बोजा चढविल्याचे समोर आले आहे.
भगवंत आरडे यांनी पाठपुरावा सुरू ठेवल्यावर शाखा व्यवस्थापकाने २८ डिसेंबर २०२० रोजी बोजा नसल्याचे पत्र आरडे व तलाठ्यासही दिले. त्यावर आरडे यांनी आक्षेप घेतला आहे. या गैरप्रकारात तलाठीही सहभागी असल्याच आरोप करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले व कार्यवाहीची मागणी केली आहे.
....
अर्थमंत्रालयात तक्रार करणार
मल्टीस्टेट सोसायट्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र शासनाला नाहीत, त्यामुळे आपण दिल्लीला जाऊन अर्थमंत्रालयातील सेंट्रल रजिस्टारकडे समिती नेमून चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे भगवंत आरडे यांनी सांगितले, याशिवाय खंडपीठातही दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
....................