जालना : पाण्याचा अंदाज न आल्याने २५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीपात्रात कोसळल्याची घटना परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावाजवळील कसुरा नदीवर गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. ग्रामस्थांनी धाव घेऊन २५ प्रवाशांना वाचविले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या प्रकरणी बस चालक के. एम. गिरी याच्याविरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, चालकाला निलंबितदेखील करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूळ यांनी दिली. ( bus drive in flood and playing with the lives of the passengers; Filed a crime against the driver)
तालुक्यात दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या-नाल्यांना पूर आलेला आहे. यातच गुरुवारी रात्री परतूर आगाराची (एमएच.१४.बीटी.२२८०) ही बस परतूरहून २३ प्रवासी घेऊन आष्टीकडे जात होती. या बसमध्ये दोन लहान मुलांसह २३ प्रवासी व चालक, वाहक असे एकूण २५ प्रवासी होते. श्रीष्टी गावाजवळ कसुरा प्रकल्प आहे. सध्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. कसुरा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जात होते. असे असतानाही प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बस चालकाने बस पाण्यात घातली. पुढे पाण्याचा अंदाज न आल्याने बस नदीपात्रात कोसळली. ग्रामस्थांनी धाव घेवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. बस चालकांना प्रवाशांचा जीव धोक्यात घालून धोकादायक ठिकाणी बस घेऊन न जाण्याच्या सूचना आहेत. असे असतानाही बसचालक के. एम. गिरी यांनी बस पाण्यात घातली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा - - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अडचणीत; बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास होणारच- कार चोरून पुण्यातून बाहेर पडले; GPS मुळे ३०० किमीवर पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले