लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बाजार समितीमधील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीमकोष खरेदी केंद्रात गुरुवारपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चांगल्या दर्जाच्या रेशीम कोषाची पस्तीस हजार रुपये प्रतिक्विंटलने खरेदी झाली. दिवसभरात एकूण नऊ क्विंटल कोष खरेदी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात रेशीम उत्पादनाकडे शेतकरी वळला आहे. चांगल्या प्रकरचा रेशीम कोषाचे उत्पादन शेतकरी काढत आहेत. मात्र, जिल्ह्यात कोठेच बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना हेलपाटे घेत कर्नाटकातील रामनगरम येथील रेशीकोष बाजारपेठेत जावे लागत असे. भाषेच्या अडचणीमुळे शेतक-यांची सुध्दा चांगलीच गैरसोय होत होती. यामुळे राज्याचे वस्त्रोउद्योग राज्यमंत्री मंत्री अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केले. याचे २२ एप्रिलला उद्घाटन करून खरेदीस सुरूवात केली आहे. केंद्रावर जालना जिल्ह्यासह हिंगोली, बीड आदी जिल्ह्यातील १७ शेतकºयांनी ९ क्विंटल रेशीम कोश विक्रीस आणला होता. पहिल्याच दिवशी शेतकºयांना ३५ हजार रूपये प्रति क्विंटल दर देण्यात आला. तब्बल साडेतीन लाख रूपयांची उलाढाल झाली. बाजार समिती परिसरात अडीच एकर जागेवर रेशीम बाजारपेठ उभारण्यात आली असून, दर गुरूवारी रेशीम कोषाची खरेदी करण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी दिली. या बाजारपेठेमुळे परराज्यात रेशीम विक्रीस जाणा-या शेतक-यांचा त्रास कमी झाला आहे. टप्प्याटप्प्याने खरेदीत वाढ करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे चौगुले म्हणाले.
जालन्यात नऊ क्विंटल रेशीम खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:18 AM